मुंबई : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनद्वारे मतदानात घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु पोलिसांच्या इशाऱ्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया दिलीय. दांडी यात्रा स्वातंत्र्य लढ्याला चालना देणारी ठरली, तर मारकडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी यात्रा ठरेल, असे मत राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलंय. वाढता फॅसिझम, एकाधिकारशाही या विरोधात मारकडवाडी उत्तम उदाहरण ठरेल, असे ते म्हणालेत. विधान भवनात जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
लोकांचा आंदोलनाचा अधिकार हिरावला : लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मारकडवाडी असे फलक त्यांनी यावेळी फडकावलेत. मारकडवाडीच्या लोकांचा आंदोलनाचा अधिकार हिरावला गेलाय. त्यांचा काय गुन्हा होता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. जो प्रयोग होणार होता तो सरकारने जबरदस्तीनं थांबवला. लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावून घेतला. त्याचबरोबर मारकडवाडीमध्ये अटकसत्र सुरू झालं. लोकशाहीच्या माध्यमातून गांधींच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे मारकडवाडीचे नागरिक यांचा गु्न्हा काय? त्यांना अटक कशाला केली? एक तर तुम्ही घाबरलात. मारकडवाडीचं लोन पूर्ण महाराष्ट्रात पसरलंय आणि अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत. मारकडवाडी हा नवीन भारताच्या इतिहासात दांडी मार्चसारखा आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी अधोरेखित केलंय.
राज्यातील जनता विसरभोळी आहे- आव्हाड : अजित पवार मालमत्ता प्रकरणातील निकालावर बोलताना ते म्हणाले की, चांगले आहे, त्यात वाईट काय आहे, केसेस सुटल्या बस्स झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीय. सरकारला ज्या पद्धतीचे पाशवी बहुमत मिळाले त्यावर असेच घडणार आहे. आता काही बोलायला अर्थ नाही, उद्या कोणी या प्रकरणाची चर्चा करणार नाही, राज्यातील जनता विसरभोळी आहे, असेही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेय.
हेही वाचा :