नांदेड Maratha Reservation Protest : राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतू, सरकारचा हा निर्णय फसवा असल्याचा आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आज (24 फेब्रुवारी) राज्यातील गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलंय.
नांदेडमध्ये तरुणानं भररस्त्यात जाळली बाईक : नांदेडमध्ये मराठा आंदोलनानं पेट घेतल्याचं पहायला मिळतंय. जिल्हाभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला असून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान नांदेडच्या लोंढे सांगवी येथील शिवहरी लोंढे या मराठा आंदोलकानं उस्माननगर रस्त्यावर आपली स्वतःची दुचाकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारचा निषेध करत या तरुणानं आपली स्वतःची दुचाकी भररस्त्यात जाळली. त्यामुळं हे आंदोलन आणखी पेटून उठण्याची दाट शक्यता आहे.
आमदारांची अडवली गाडी : नांदेडनजीक असलेल्या पिंपळगाव येथे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. तसंच यावेळी जवळगावकर यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. मराठा आंदोलकांनी जवळगावकर यांची गाडी पुढं जाऊ दिली नाही. अखेर त्यांना काही किलोमीटर पायी प्रवास करावा लागला.
सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको : सकल मराठा समाज बांधवांचा वतीनं ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेड-हैदराबाद रोडवरील चंदासिंग काॅर्नर आणि नांदेड उस्माननगर रोडवरील बाभुळगाव पाटी येथे आज सकाळी तीन तास आंदोलन करण्यात आले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा -