ठाणे Maratha Reservation : "एक मराठा, लाख मराठा", "कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय" अशा घोषणा देत मराठा आंदोलनाचं भगवं वादळ हळूहळू मुंबईच्या दिशेनं घोंघावत आहे. या आंदोलनाचे थेट पडसाद सातासमुद्रापार उमटत आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती टाइम्स स्क्वेअरवर काही मराठमोळ्या तरुणांनी मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ बॅनर लावत पाठिंबा दर्शवला आहे.
आरक्षणावर तोडगा काढण्यात अपयश : मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. मात्र, सरकार त्यांच्या आरक्षणाची मागणी गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसत आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढून आपली ताकद दाखवतोय. मात्र त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं दिसत नाही. प्रत्येक नेता आरक्षणाच्या बाजूने बोलत असून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं सांगत विरोधकांवर खापर फोडत आहे. पण सरकार कोणाचेही असो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
मराठा आंदोलनाचा मुंबईला फटका : आता मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं हे चित्र बदलेल, असा विश्वास मराठा समाजाला वाटतोय. प्रत्येक वेळी मराठा मोर्चाला सरकारनं आश्वासनं दिली. परंतु आरक्षण मिळालेलं नाहीये. यावेळी आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील लाखोंच्या जनसमुदायासह मुंबईत धडकणार आहेत. त्यामुळं मराठा आंदोलनाचा फटका राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला बसणार आहे, तर दुसरीकडं या आंदोलनाला आता परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे.
टाइम्स स्क्वेअरवर झळकावलं पोस्टर : धाराशिवचे नितीन सुबराव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील काही तरुणांनी थेट न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी, म्हणजे टाईम्स स्क्वेअरवर मराठा आंदोलनाचं बॅनर झळकावलं आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो लावण्यात आल्याचं दिसतं.
हे वाचलंत का :