धुळे Police Trainees Suffer Food Poison : पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली. गुरुवारी रात्रीच्या जेवणातून सुमारे 70 पोलीस कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. "पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त खरं आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे," अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली.
राज्यातील पहिले महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र : धुळे इथल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर पोलीस प्रशिक्षण केंद्र सरकारनं सुरू केलं आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेलं हे राज्यातील पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे. परंतु आता पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचंही ट्रेनिंग या केंद्रात दिलं जाते.
उपहार गृहातच बिघडली प्रकृती : गुरुवारी नेहमीप्रमाणे जवानांना प्रशिक्षण देण्यात आलं. रात्री आठ वाजता जेवणाच्या हॉलमध्ये सर्व एकत्र जमले. जेवण करत असतानाच एका प्रशिक्षणार्थीची प्रकृती बिघडली. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं रुग्णवाहिका बोलवण्यात आली. रुग्णवाहिका दाखल होत नाही, तोपर्यंत एका पाठोपाठ एक याप्रमाणं 70 जणांना एकाच वेळेस अस्वस्थ वाटू लागलं. या सर्वांना रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मोठ्या वाहनांनी तातडीनं हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.
सर्वांची प्रकृती स्थिर : "पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना आधीच कळवण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच वैद्यकीय यंत्रणा अलर्ट होती. हिरे रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित उपचार सुरू केले. त्यामुळे सर्व बाधित रुग्णांची प्रकृती आता सुधारत आहे," अशी माहिती डॉ. रवी सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
विषबाधा होण्याची दुसरी घटना : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा होण्याची पुनरावृत्ती झाली आहे. काही वर्षांपूर्वी देखील अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी तरुणींचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यांनाही तातडीनं उपचार मिळाल्यानं मोठा अनर्थ टळला होता. अन्नातून विषबाधा झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यात ; महिला न्याय हक्क परिषदेचं आयोजन
- राईनपाडातील भिक्षुकांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना जन्मठेप, सोशल मीडियातील अफवेनं कसं घडलं होतं हत्याकांड?
- Molestation Case On Police Officer: पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल; 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल, विनयभंगाचा गुन्हा दाखल