नागपूर : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तथा नागपूरचे भूमिपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस यांचं शहरात आगमन झालं. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथम नागपूरला आल्यानं त्यांच्या स्वागताची रॅली काढण्यात आली. मात्र, ही रॅली भाजपा कार्यकर्ते आणि सामान्य नागपूरकरांना मोठा आर्थिक नुकसान देऊन जाणारी ठरली आहे. लाडक्या देवाभाऊच्या स्वागतासाठी आलेल्या नागरिकांची पाकीटं, दागिन्यांवर चोरट्य़ांनी डल्ला मारला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कित्येक भाजपा कार्यकर्ते आणि सामान्य नागपूरकरांना चोरट्यांनी जोरदार झटका दिला आहे. काहींचे दोन तोळे, काहींचे चार तोळे तर काहींचे पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. तर काहींच्या खिशातून मोठ्या प्रमाणावर पैसे चोरट्यांनी चोरले आहेत.
देवाभाऊ समर्थकांना चोरट्यांनी दिला झटका : नागपूर शहरातील बजाज नगर आणि सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारकर्त्यांची तक्रारी दाखल करण्यासाठी रिघ लागलेली आहे. आतापर्यंत 25 तक्रारकर्त्यांनी बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे दागिने किंवा खिशातील पैसे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून कुठलाही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
धक्काबुक्की आणि पाकीट गायब : जेवढ्या लोकांच्या दागिन्यांची किंवा खिशातील पाकीटं मारले गेले आहेत, त्यापैकी प्रत्येकाला रॅलीमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. धक्काबुकी झाल्यानंतरच चोरट्यांनी हात साफ केल्याचं दिसून येत आहे. चोरट्यांनी अगोदर धक्काबुक्की करुन त्यानंतर पाकीटं आणि दागिन्यांवर डल्ला मारला, असं देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीतील काही पीडितांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी 11 चोरट्यांना पकडलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :