मुंबई Mamata Banerjee in Mumbai : लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले असून विरोधी पक्षातील सदस्यांना महत्त्व प्राप्त होत आहे. इंडिया आघाडीबरोबर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला सातत्यानं टक्कर देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं त्या मुंबईत आहेत. विवाह सोहळ्याचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात राजकीय रणनीती देखील आखली जाण्याची शक्यता आहे. अशातच त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेसंदर्भात मोठी घोषणा केली.
ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा : सीपीएम, तृणमूल बंगालमध्ये एकत्र येणं कठीण आहे. सीपीएमविरोधात आम्ही लढलो. त्यामुळे बंगालमध्ये एकत्र येणार नाही. तसंच पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही चर्चा न करता संविधानाची हत्या केली, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीका केली. मुंबईत आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांना भेटते. काँग्रेसमधील महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्यांना फारसं ओळखत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. अंबानी कुटुंबीयांनी आग्रह केल्यामुळे आपण या विवाह सोहळ्याला उपस्थित राहत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
भाजपाविरोधी रणनीतीवर होणार चर्चा : लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच मुंबईत आल्या आहेत. या दौऱयात ममता बॅनर्जी या शरद पवार यांची 'सिल्वर ओक' या निवासस्थानी भेट घेणार आहेत. तत्पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि देशातील विविध प्रश्नांबाबत ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विरोधी पक्षांची आघाडी अधिक मजबूत करता येईल आणि भारतीय जनता पक्षाला संसदेत कशा पद्धतीने टक्कर देता येईल, याची रणनीती या भेटीमध्ये अधिक ठळकपणे ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मजबूत विरोधी पक्षाच्या बांधणीसाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. यामध्ये सुरुवातीला ममता बॅनर्जीही सामील झाल्या होत्या. मात्र, पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना त्या आपल्या विरोधक मानत असल्यामुळे त्या या आघाडीत राहिल्या नव्हत्या. निवडणुकीच्या निकालानंतर त्या पुन्हा एकदा इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष बनल्या. दहा वर्षानंतर संसदेमध्ये विरोधी पक्षांची मजबूत ताकद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची मुंबई भेटीत होणारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
हेही वाचा -
- ममता बॅनर्जींना हायकोर्टाचा दणका; कोलकाता उच्च न्यायालयानं शिक्षक भरती केली रद्द, 25,000 शिक्षकांनी गमावल्या नोकऱ्या - Calcutta HC On Teacher Recruitment
- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदाराकडून ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या घराची रेकी; कोलकाता पोलिसांनी केली अटक - Kolkata Police Arrested Mumbai Man