मुंबई Maharashtra Politics: लोकसभेच्या दारुण पराभवानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा हायकमांकडून मोठा फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून त्यांना मोकळं करण्याची विनंती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला केली होती. केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या राज्याच्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीसांची ही मागणी फेटाळण्यात आली. राज्यात कुठलेही बदल केले जाणार नाही, अस स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम लागलाय.
राज्याच्या नेतृत्वात कुठलेही बदल नाहीत: लोकसभा निवडणुकीत राज्यात तसेच मुंबईत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात मोठं फेरबदल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यातच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राज्यात देवेंद्र फडणवीस हेच प्रमुख नेते: दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, "आजच्या बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून राज्यात भाजपा नेतृत्वात कुठलाही बदल केलं जाणार नाही." येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत फडणवीस राज्यात महत्त्वाची धुरा सांभाळणार आहेत असे, स्पष्ट संकेत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं दिलं आहेत.
विधानसभेसाठी रोड मॅप: या बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज महाराष्ट्राची कोअर कमिटीची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक होती. यामध्ये महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालावर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्रात केवल ०.३ टक्क्यांनी आम्हाला कमी मतं मिळाली. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील विजयाच्या टक्केवारीवर चर्चा झाली. आम्ही कुठं कमी पडलो, त्याचा काय परिणाम झाला? यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत, यावर सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची रणनीती असायला पाहिजे? त्याच्या ब्लूप्रिंटवर आमची चर्चा झाली. एनडीएच्या घटक पक्षांबरोबर चर्चा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी आम्ही रणनीती तयार करणार आहोत. याकरता केंद्रीय भाजपाचं नेतृत्व यासाठी पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं आहेत. याबाबत आम्ही लवकरच रोड मॅप तयार करू," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं राज्यातील ४८ जागांपैकी १७ जागा जिंकल्या आहेत. भाजपाला ९, शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी(अजित दादा गट) १ जागा मिळाली. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सामावेश असलेल्या महाविकास आघाडीला ३० जागांवर यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुतीला अपयश आल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती.
हेही वाचा