सातारा : कराड जिल्हा व्हावा, म्हणून मुख्यमंत्री पदाच्या काळात सोयी सुविधा निर्माण केल्या. परंतु, मागील दहा वर्षातील भाजपाच्या अस्थिर सरकारमुळे कराड जिल्हा होऊ शकला नाही, असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसंच आता मविआचं सरकार आल्यानंतर कराड जिल्ह्याची निर्मिती करणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यंदा राज्यात सत्तांतर अटळ : आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील विंग (ता. कराड) येथील हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर झालेल्या विराट सभेत बोलताना ते म्हणाले की, "1991 साली मी नवखा असताना मला तुम्ही पदरात घेऊन आशीर्वाद दिला. त्यावेळी मी पहिल्यांदा खासदार झालो. नंतर केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सेवेत आलो. सध्याचं राज्यातील सरकार भयभीत आहे. रोजगार नसल्याने लोक हवालदील आहेत. युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न आहे. महागाईने कबरडं मोडलं आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबना झाली आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही."
मुख्यमंत्रीपदाच्या काळात 1800 कोटींची विकासकामं : मुख्यमंत्री पदाच्या काळात कराड दक्षिणमध्ये 1800 कोटींची विकासकामं केली. मात्र, मागील दहा वर्षात विकासकामं करताना मर्यादा आल्या. महाविकास आघाडीच्या सरकारच्या पहिल्या अडीच वर्षाच्या काळात चांगला निधी आणला. त्यानंतर महायुती सरकार सत्तेवर आलं. तरी देखील 1400 कोटी रुपयांची विकासकामं केली. निधी आणण्याचा सरकारी आणि प्रशासकीय अभ्यास असल्यानं निधी आणण्यात यश आल्याच पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
पराभवानंतर 'लाडकी बहीण' आठवली : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "लोकसभेतील पराभवानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली. त्या आधी ही योजना सुरु करावी, असं वाटलं नाही. या योजनेचं पहिल्यापासूनच आम्ही स्वागत केलं आहे. कारण या योजनेची सुरुवातच कर्नाटकमधील आमच्या काँग्रेसच्या सरकारनं केली आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही देखील ही योजना सुरू ठेऊ आणि महिलांना दरमहा 2 हजार देऊ," अशी ग्वाही त्यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा : पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधातील भाजपा उमेदवार अतुल भोसले यांचे चुलते आणि भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते यांनी देखील पृथ्वीराज चव्हाण हेच श्रेष्ठ आणि योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य केलं आहे. विधानसभेत जाणारा माणूस हा कोणाचाही हस्तक नसावा, तो कोणाचा चापलूस नसावा, तो अभ्यासू असावा. याकरिता मला पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही. कराड दक्षिणचा खऱ्या अर्थानं विकास साधण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा