मुंबई - विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर करून महायुतीनं सत्ता मिळविल्याचा महाविकास आघाडीकडून सातत्यानं आरोप होत आहे. काँग्रेसनं मतदानातील आकडेवारीवरदेखील संशय व्यक्त केला आहे. निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला जात असल्यानं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी विविध आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी म्हणाले, "मी पूर्ण जबाबदारीनं सांगतो, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. याचं एक साधं कारण आहे. ईव्हीएममध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्समध्ये फक्त एकदाच प्रोग्रॅमिंग करता येते. त्यामुळे त्यात छेडछाड करणं अशक्य आहे. ईव्हीएम ही स्वतंत्र मशीन आहे. त्याला कोणतेही नेटवर्क किंवा बाहेरुन गॅझेट जोडता येत नाही. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार व्हीव्हीपॅटमध्ये मोजण्यात आलेली मते आणि ईव्हीएममधील मते यांची पडताळणी केली जाते. अंतिम निकालापूर्वी ही प्रक्रिया केली जाते." "ईव्हीएमबाबत राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये बरेच गैरसमज असल्याचं दिसून येत आहे. परंतु असे गैरसमज बाळगण्याची आवश्यकता नाही," असेदेखील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
अशी होते मतमोजणीची पडताळणी- ईव्हीएममधील कथित गैरवापराबाबत महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून सातत्यानं ईव्हीएमबाबत आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील मतमोजणी पडताळणी कशी केली जाते, याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी माहिती दिली. सर्व ईव्हीएममधील मतांची मोजणी संपल्यानंतर निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगानं प्रक्रिया निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं.
योग्य पद्धतीनं राबविली प्रक्रिया- "लॉटरी काढून 5 मतदान केंद्रांची निवड केली जाते. ही लॉटरी पद्धतीनं केलेली निवड मतदारसंघ निरीक्षक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते. त्यांच्या उपस्थितीत व्हीव्हीपीएटी मशीन आणल्या जातात. व्हीव्हीपॅटमधून स्लिप्स काढल्या जातात. कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली? याची व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधून मोजणी केली जाते. या दोन आकड्यांमध्ये कोणतीही तफावत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत योग्य पद्धतीनं योग्य प्रक्रिया राबवून मतदान झालं आहे," असा दावा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी कुलकर्णी यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय केला आरोप?लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. "ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळेच मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित राहावा. बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे, या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
हेही वाचा-