मुंबई Maghi Ganesh Jayanti 2024 : येत्या मंगळवारी 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. यासाठी मुंबईतील गणेश कारखान्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकार आता गणपती बाप्पाच्या विविध रूपातील मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.
मूर्तीला अंतिम स्वरूप : 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती येत असल्यानं मुंबईतील विविध गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. रात्रंदिवस मेहनत केल्यानंतर मूर्तीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. विविध स्वरूपातील गणपती बाप्पाच्या मूर्ती त्यांच्याकडं पाहायला मिळता आहेत. विशेष म्हणजे माघी गणेश जयंतीनिमित्त दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाही या संख्येत मोठी वाढ झाली आहे, असं मूर्तिकारांनी सांगंतलं. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येते त्यावेळी जशी मूर्तींना मागणी असते, त्याचप्रमाणे माघ महिन्यात गणेशमूर्तींना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शाडूच्या मुर्त्यांना जास्त प्राधान्य : यंदाही गणेशमूर्तींना मागणी वाढली असून, शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींना गणेशभक्त अधिक पसंती देत असल्याचं मूर्तिकार राजेश हजारे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे माघी गणपतींची संख्या जास्त असल्यानं मूर्तीची उंची दीड फूट ते कमाल दोन ते अडीच फूट असते. ही मूर्ती शाडूच्या मातीची असल्यानं मूर्ती अतिशय सुंदर, नयनरम्य दिसते. तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्तींच्या किमती वाढल्या असल्या तरी गणेशभक्तांसाठी ही वाढ फारशी मोठी नाही. विघ्नहर्ता बाप्पासाठी 10 ते 15 टक्के वाढ कोणत्याही गणेशभक्ताला आनंदानं स्वीकारता येईल. कारण भक्तांना सध्याच्या वाढत्या महागाईची जाणीव आहे.
संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण : मुंबईतील विविध गणेश कारखान्यांमध्ये गणपती बाप्पाच्या विविध रूपातील मूर्ती गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत आहेत. गेल्या वर्षी माघी गणपतीचं आगमन 25 जानेवारीला झालं होतं. तर, बाप्पानं 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी निरोप घेतला होता. यंदा गणरायाचं आगमन 20 दिवस उशिरा असलं, तरी गणेशभक्त या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. माघी गणपती उत्सव अवघ्या दोन दिवसांचा असल्यानं संपूर्ण कुटुंबात आनंदाचं, भक्तिमय वातावरण आहे. विशेष म्हणजे गणपतीच्या बापाच्या दर्शनासाठी कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटत आहेत.
हेही वाचा -