मुंबई Lok Sabha Elections 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढलाय. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना, आता शिंदेंच्या शिवसेनेतील चार विद्यमान खासदारांचं तिकिट डावललं जाण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या चार खासदारांच्या जागेवर भाजपाकडूनही दावा सांगितला जातोय. त्यामुळं शिंदे गटाच्या विद्यमान 4 खासदारांना तिकिट मिळणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पाहूया कोण आहेत हे चार खासदार?
कोणत्या खासदारांचा समावेश : शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील (हिंगोली), हेमंत गोडसे (नाशिक), गजानन किर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई) आणि भावना गवळी (वाशिम-यवतमाळ) यांचा यामध्ये समावेश आहे. याचं कारण म्हणजे, हे चारही खासदार मतदारसंघातील समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले आहेत. 2019 नंतर या चारही खासदारांच्या कामांचा लेखाजोखा पाहता त्यांच्याकडून सुमार कामगिरी राहिली आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठी यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहेत.
कोणत्या कारणामुळं खासदार अडचणीत? : मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातील गजानन किर्तीकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. याच मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल किर्तीकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच गजानन किर्तीकरांची तब्येत आणि वयाच्या विचार करता त्यांना तिकिट मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झालंय. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळं अडचणीत आल्या होत्या. तसंच याप्रकरणी ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत त्यांची काही संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळं यामुद्द्यावरुन विरोधक सातत्यानं त्यांना धारेवर धरत असतात, आणि यामुळंच त्यांचं तिकिट डावललं जाऊ शकतं.
तिसरे खासदार म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सलग दोनदा खासदार राहिलेले हेमंत गोडसे. काही दिवसांपूर्वी गोडसे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं त्यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची कामगिरी सुमार असल्यानं त्यांनाही तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला असा असणार? : भाजपाकडून लोकसभा उमेदवारांचा फॉर्म्युला तयार असल्याचं बोललं जातंय. भाजपा 35 ते 37 जागांवर लढण्याती शक्यता आहे. तसंच शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेसोबत सध्या 13 खासदार आहेत. 2019 मध्ये शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 18 खासदार विजयी झाले होते. आताही आम्हाला 18 ते 23 जागा मिळाव्यात अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेची आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाला केवळ 8 किंवा 9 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 किंवा 5 जागा मिळू शकतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -