पुणे Lok Sabha Election 2024: "बारामती लोकसभा मतदारसंघात 'तुतारी' या चिन्हावर सुप्रिया सुळे या निवडणूक लढवणार आहेत. भाजपा नेमकं कोण उमेदवार देणार आणि त्यांचं चिन्ह कुठलं असणार हे त्यांनाच माहीत आहे," असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं असून रोहित पवार यांनी भाजपावर टीका केलेली आहे. ते आज कालवा समितीच्या बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या बैठकीमध्ये सहभाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधला आहे.
राम शिंदेंच्या कुकडीतून पाणी सोडण्यास विरोध: रोहीत पवार म्हणाले की, ''माझ्या मतदार संघात कुकडीचे पाणी येते. ते 1 मार्च पासून सोडावे, अशी विनंती अजित पवारांना केली. ती त्यांनी मान्य केली आहे. माझ्या मतदार संघातील दुसरे आमदार राम शिंदे यांनी कुकडीतून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. उजनीतील पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा पट पाणीपट्टी दर केला आहे. तो कमी करण्यास अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे."
राज्यात सध्या दडपशाहीचं सरकार: अमोल मिटकरी यांनी 'तुतारी' या चिन्हावरुन टीका केली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ''राज्याच्या विकासावर एखाद्या विचारवंतानं बोललं असतं तर, मी चर्चा करायला तयार आहे. मिटकरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते एका आयपीएस अधिकाऱ्याला शिव्या देतायेत. राज्यात सध्या दडपशाहीचं सरकार असून आपण हिरो झाल्याची भावना प्रत्येक सत्तेतील नेत्यांना झाली आहे. गरिबांचं ऐकलं जात नाही, गुंडगिरी वाढत आहे. अधिकाऱ्यांना धमकावलं जात आहे आणि सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे.''
नितेश राणे सारख्यांना सागर बंगल्यावर अभय : नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सागर बंगल्यावर आपला बॉस आहे, असं म्हटलं आहे. त्यावर "नितेश राणे हे एका मोठ्या राजकीय नेत्याचे पुत्र आहेत, सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे ते स्फोटक बोलत आहेत. सागर बंगल्यावर अशाच लोकांना अभय दिलं जातं. सागर बंगल्यावर अशाच लोकांचं ऐकलं जातं. तो सागर बंगला सामान्यासाठीही आहे का नाही? हे एकदा महाराष्ट्राला सांगा. गरिबासाठी सागर बंगला आहे का नाही हेही सांगा," अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे.
नारायण राणे सिंधुदुर्ग लोकसभा लढणार ? : अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनीसुद्धा तुतारी वाजेल का हवा निघेल, अशी टीका केली. त्यावर "त्यांचे दिल्ली दौरे का वाढले? त्यांचे मित्र त्यांचे तिकीट कापत आहेत का? याचा आधी विचार करा. मग कळेल त्यांचीच उमेदवारी नक्की नाही. त्यामुळे ते असे बोलत असतील त्यांना कळेल हवा कुणाची निघेल," असंसुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत. नारायण राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा लढणार आहेत. म्हणून मुख्यमंत्र्याची भेट घेत आहेत. त्यावर बोलताना "नारायण राणे यांना लोकसभेला निवडणूक लढवून त्यांना अडचणी आणलं जात आहेत. या अगोदर नारायण राणे यांनी मराठा समाजाविषयी अनेक विषयांवरती केलेली वादग्रस्त विधाने ही त्यांना अडचणीत आणू शकतात."
हेही वाचा:
- डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण
- उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू
- 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?