अमरावती Mahua Flowers In Melghat : सातपुडा रांगेत वसलेला मेळघाट हा उंच पहाड, दरी, घनदाट जंगल, वाघ, अस्वल असे प्राणी आणि आदिवासी समुदायाच्या विविध परंपरा यांनी नटलेला असतानाच मेळघाटातील 'सिड्डू' ही देखील विशेष प्रसिद्ध आहे. कोरकू भाषेतील 'सिड्डू' या शब्दाचा अर्थ दारू असा होतो. ही सिड्डू मोहाच्या फुलांपासून तयार केली जाते. सध्या वसंत ऋतूत मेळघाटात मोह बहरला असून उंच झाडावरून जमिनीवर पडणारे हे मोह फूल वेचण्यासाठी झाडाखाली आधी आग लावली जाते. मोहफूल (Maha Flower) वेचण्याच्या या आगळ्यावेगळ्या परंपरे संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं खास आढावा घेतला आहे.
पहाटे कोसळतो मोह फुलांचा पाऊस : संपूर्ण मेळघाटात मोहाची एकूण 25 ते 30 हजार झाडं आहेत. सध्या वसंत ऋतूत मोहाची झाडं फुलांनी बहरली आहेत. मोहाची फुलं खाण्यासाठी माकडांची टोळी या झाडांवर सध्या मुक्काम ठोकूनच असते. मोहाच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं पहाटे तीनच्या सुमारास उगवतात आणि पहाटे चारच्या दरम्यान ही फूलं झाडावरून गळून खाली पडतात. पहाटेच्या वेळी मोहाच्या झाडाखाली जणू फूलांचा पाऊसच कोसळतो असा अनुभव येतो.
आग लावण्याचं असं आहे कारण : मेळघाटातील आदिवासी बांधव अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मोह फुलं गोळा करून त्याची दारू काढतात. सध्या झाडावर मोह फुलं बहरली असून जंगलात झालेल्या पान गळतीमुळं झाडाखाली मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानांचा खच साचला आहे. जिकडं तिकडं सुकलेली पान जमिनीवर पडली असल्यामुळं पहाटेच्या सुमारास मोहाच्या झाडावरून खाली कोसळणारा फुलांचा सडा हा या सुकलेल्या पानांमध्ये अडकून बसतो. या सुकलेल्या पानांमधून मोहाची फूलं वेचणं सोपं काम नाही. यामुळंच मोहाचे झाड बहरताच झाडाखाली आग लावून त्याखाली असणारी सुकलेली पान पेटवून दिली जातात. यानंतर या सुकलेल्या पानांची राख झाडून दूर केली जाते. यामुळं झाडाखाली पडणारी फुलं सहज वेचता येणं शक्य होतं.
जो पेटवेल आग त्याचाच झाडावर अधिकार : मेळघाटातील एखाद्या आदिवासी व्यक्तीनं आपल्या गावाशेजारी असणाऱ्या मोह फुलाचे झाड निवडतात. झाडाखालील सुकलेल्या पानांना आग लावून झाडाखालचा परिसर जो झाडून स्वच्छ करतो त्या झाडावर संबंधित आदिवासी व्यक्तीचा पूर्ण अधिकार होतो. ज्या व्यक्तीनं त्या झाडाखाली साफसफाई केली केवळ तीच व्यक्ती पहाटे येऊन झाडाखाली पडलेली मोहफुलं वेचते. पहाटे झाडावरून फुलं खाली पडली असताना इतर व्यक्ती त्या ठिकाणी आली तरी या फुलांवर आपला अधिकार नाही याची जाणीव ठेवून कोणीही त्या फुलांना हात देखील लावत नाही. ज्याची मेहनत त्यालाच फळ इतकी प्रामाणिकता आज देखील आदिवासी बांधवांमध्ये जोपासली जाते, अशी माहिती गोरेलाल कालू बेठे यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली.
होळीपासून होते फुलं वेचायला सुरुवात : वसंत ऋतूत बहरलेल्या मोहाच्या झाडावरील फुलं ही होळीपासून पुढील दहा-पंधरा दिवस पहाटे झाडावरून खाली कोसळतात. यामुळं आदिवासी बांधव होळीपासूनच मोहफुलं वेचण्यास सुरुवात करतात. मेळघाटातील काही गावांमध्ये सामुदायिक पद्धतीनं देखील मोहफुलं वेचली जातात. मोहफूल वेचण्याकरिता झाडाखाली आग लावण्याची जी पारंपारिक पद्धत आहे, त्या पद्धतीवर मात करण्यासाठी मोह फुलाच्या झाडाखाली साड्या टाकून मोहफूल वेचता येऊ शकतं का? याबाबत देखील काही मंडळी विचार करीत आहेत.
आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून मोहाला मान : उष्ण कोरड्या जमिनीवर येणारे मोह हा पानगळी वृक्ष आहे. देशातील महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्ये मोहाची गणना केली जाते. आदिवासी बांधवांना पैशांची गरज असते. त्यावेळी सुकलेली मोहाची फूलं ही बाजारात नेऊन ते विकतात. मोहाच्या फुलांद्वारे दारू काढण्यासोबतच मोहाच्या बियांपासून तेल देखील काढले जाते. पूर्वी स्वयंपाकासाठी देखील मोहाचे तेल आदिवासी बांधव वापरत होता. आज देखील मेळघाटातील काही गावांमध्ये मोह फुलाचे तेल खाण्यासाठी वापरले जाते. मार्च महिन्यात येणारी मोहाची फूलं ही मे महिन्यापर्यंत राहतात. आदिवासी बांधव देवाधर्मात औषधात मोह फूलांचा वापर करतात. मोहाच्या फुलाफळांपासून उदरनिर्वाहाची व्यवस्था होते. इतके पैसे मिळत असल्यामुळं या वृक्षाला मेळघाटातील कल्पवृक्ष म्हटलं जातं.
मोहा मध्ये 67.9 टक्के अल्कोहोल : संपूर्ण भारतात मोह फूलाचे उत्पादन हे 22 लाख टन इतके आहे. मेळघाटात मोहाची जवळपास 25 ते 30 हजार झाड आहेत. मोहफुलामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 67.9 टक्के आहे. एक टन मोह फूलापासून सुमारे 340 लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. केवळ दारूच नव्हे तर मोहाचे लाडू देखील तयार केले जातात. कपडे धुण्यासाठी साबण देखील मोहापासून तयार केला जातो. मेणबत्ती आणि सॅनिटायझर यासाठी देखील मोहाचा आता वापर व्हायला लागला आहे. मोह फुलांमध्ये 70 टक्के खनिज, 22.70 टक्के कार्बोहायड्रेट, 111 टक्के कॅलरीज, 45 टक्के कॅल्शियम, 23 टक्के लोहतत्व आणि 40 टक्के विटामिन सी असल्याचं संशोधनाद्वारे सिद्ध झालंय.
हेही वाचा -