अमरावती Leopard Terror In Ahmednagar : गेल्या काही काळापासून जंगलात राहणारा बिबट्या सर्रासपणे शहरी भागात आक्रमण करत असल्याचं बघायला मिळतंय. या घटनांत होत चाललेली वाढ पाहता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नागरिकही धास्तावले आहेत. तसंच बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यात निष्पाप बालकांचा बळी जाण्याच्या घटना सलगपणे होताना दिसत असल्यानं नागरिकांत भीती आणि संतापाची भावना आहे. असं असतानाच आता सादतपूर येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
चिमुकल्याचा मृत्यू : हर्षल राहुल गोरे गंभीर (वय-5) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हर्षल आपल्या भावासह चुलत्याच्या घरी जात असताना रोड लगत गिन्नी गवतात लपून बसलेल्या बिबट्यानं हर्षलवर झडप घालून त्याला गवतात ओढत नेलं. हे बघून त्याचा भाऊ जोर-जोरात ओरडत घराकडे पळाला. हर्षलचे कुटुंबीय गवताजवळ येताच बिबट्यानं तिथून धूम ठोकली. जखमी हर्षलला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
बिबट्यांची पिंजऱ्यांना हुलकावणी : लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्यानं सादतपूरमध्ये पुन्हा पाच वर्षीय बालकावर हल्ला करून त्याला ठार केलं. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळं सादतपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसापासून वन विभागानं विविध ठिकाणी 15 पिंजरे लावले आहेत. वन विभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करत आहेत. त्यामुळं नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झालाय.
9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू : राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोरील गोसावी वस्तीवर राहत असलेल्या अथर्व प्रवीण लहामगे (वय 9) या बालकाचा 14 जानेवारी रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अथर्व हा घराजवळीळ शेतात खेळत होता, तेव्हा त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला. रात्र झाली तरी अथर्व घरी नं परतल्यानं त्याचा शोध घेण्यात आला असता रात्री दहा वाजता त्याचा मृतदेह सापडला. लहामगे कुटुंब ज्या परिसरामध्ये राहतात, त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, तरीही वन विभागाकडून यासंदर्भात काहीच करण्यात आलं नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेट वस्तीवर एकच बिबट्या कैद झाला आहे.
हेही वाचा -