मुंबई Vijay Wadettiwar on Farmers Loan : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह वीजबिल माफ करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षानं मांडलेल्या 293 च्या प्रस्तावावर चर्चा करताना वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारच्या कुठल्याच कामाची हमी नसल्यामुळं राज्यातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत. निसर्गाकडून होणाऱ्या अवकृपेनंतर सरकारकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्यांपैकी 30% आत्महत्या राज्यात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. सरकार हमीभाव देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतोय. महागाईनं राज्यात उच्चांक गाठला असून सरकार देत असलेल्या सहा हजार रुपये मदतीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होत नाही. हे सरकार केवळ प्रचार, प्रसिद्धी, निवडणुका, टेंडरमध्येच गुंतले आहेत. शेतकऱ्यांबद्दल या सरकारला जराही दयामाया नाही. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
विमा कंपन्यांची मुजोरी वाढली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा करतात. मात्र, सरकारी माहितीनुसार केवळ चार हजार सहाशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना पोहोचली आहे. तसंच केंद्र सरकारकडं त्यांनी मागितलेल्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या मदतीबाबतही सरकारनं काहीही दिलं नाही. त्यामुळं तुमची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात शेतकरी बोगस बियाण्यांमुळं त्रस्त झाला आहे. विमा कंपन्यांची मुजोरी वाढली आहे. मात्र, याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. मागेल त्याला शेततळं योजना ही अत्यंत फसवी योजना असून या योजनेमध्ये असलेल्या अटी, कागदपत्रामुळं शेतकऱ्यांना शेततळी मिळत नाहीत, असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का :
- मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; जिल्हा बँकेच्या पातळीवर राबविली जाणार योजना - ladki bahin yojana
- एमसीए निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी नाना पटोलेंना कुणाचा फोन आला? नितेश राणेंचा सवाल - Nitesh Rane
- विधान परिषद निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, 4 आमदारांनी मारली दांडी - MLC ELECTION 2024