नाशिक Kargil Vijay Diwas : पाकिस्तानी 1999 साली सैन्यानं घुसखोरी करून कारगिल भागावर अतिक्रमण केलं होतं. यामुळे झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानला तेथून हुसकावून लावलं आणि कारगिलवर पुन्हा भारताचा झेंडा डौलात फडकला. 60 दिवस चाललेल्या या युद्धात 30 हजार भारतीयांनी लढाई केली. यात भारतीय सैन्याचे 527 जवानांना हौतात्म्य पत्कारावं लागलं, तर 1363 जवान जखमी झाले होते.
सर्वांत प्रथम तोफेतून टाकला गोळा : जगाच्या इतिहासात कारगिल युद्धाचा समावेश जगातील सर्वोच्च भागात (सर्वांत उंच) झालेल्या युद्धाच्या घटनांमध्ये केला जातो आणि याच युद्धात हरियाणात जन्मलेले आणि सद्यस्थितीत नाशिकमध्ये राहणारे नायक दीपचंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कारगिल युद्धात (ऑपरेशन विजय) तोलोलिंगवर सर्वांत प्रथम तोफेतून गोळा दुश्मनांवर डागला होता. 26 जुलैला कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण होत असून, नायक दीपचंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला.
कारगिल विजय दिवस : 1999 मध्ये काश्मीरमधील कारगिल भागात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या कटामागे पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. भारतीय सैन्यानं या घुसखोरांना जिहादी समजले आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपले काही सैनिक पाठवले. प्रतिस्पर्ध्यांकडून होणारे प्रत्युत्तरादाखल हल्ले आणि एकापाठोपाठ एक अनेक भागात घुसखोरांच्या उपस्थितीच्या बातम्या आल्या. यावरून लक्षात आलं की, प्रत्यक्षात ही नियोजित आणि मोठ्या प्रमाणात घुसखोरी होती. यामध्ये केवळ जिहादीच नाही तर पाकिस्तानी सैन्याचाही सहभाग होता. हे लक्षात घेऊन भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन विजय' सुरू केलं.
भारतीय सैन्याचा विजय : 60 दिवस चाललेल्या या युद्धात 30 हजार भारतीय सैनिकांनी लढाई केली. यात भारतीय सैन्याच्या 527 जवानांना वीरमरण आलं तर 1363 जवान जखमी झाले होते. अखेर दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्यांचा पराभव केला आणि 26 जुलै 1999 ला शेवटचं शिखरही जिंकलं. हा दिवस आता 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
ऑपरेशन विजय : "कारगिल युद्ध दरम्यान मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की, आम्हाला राशन नको. मात्र, गोळा-बारूद जास्त द्या. कारगिल युद्धात आमच्या युनिटने आठ गन पोझिशन रेंज चेंज केली आणि दहा हजारहून जास्त तोफगोळे घुसखोरांवर डागले. हा एक रेकॉर्ड आहे आणि यासाठी आम्हाला सैन्यानं सन्मानित देखील केलं. आमच्या या कार्यामुळं आम्हाला 12 गॅलेंट्री पुरस्कार आणि कारगिल युद्धात सामील होण्याचं सौभाग्य मिळालं. आज आमच्या 'मेरी बटालियन 1889 रेजिमेंटल'चे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरानं कोरलं गेलं. या बटालियनचा मला भाग होता आला याचा मला गर्व आहे; परंतु या युद्धात माझे सहकारी हुतात्मा झाले याचीही खंत आहे," असं नायक दीपचंद यांनी सांगितलं.
एक हात, दोन पायांचं बलिदान : नायक दीपचंद हे हरियाणा राज्यातील हिसार येथील पंचग्रामी येथील रहिवासी आहेत. दीपचंद हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना प्रेरित होतं भारतीय सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जम्मू-काश्मीरला सैन्यातील गुप्तचर विभागामध्ये काम केलं. अशात 'ऑपरेशन रक्षक'मध्ये त्यांनी 8 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. कारगिल युद्धानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. याला 'ऑपरेशन पराक्रम' असं नाव देण्यात आलं होतं. त्यात स्टोअर अनलोडिंग बॉम्बस्फोटामध्ये झालेल्या दुर्घटनेत नायक दीपचंद यांना आपले दोन पाय, एका हाताचं बलिदान द्यावं लागलं. मात्र, मनात असलेल्या देशप्रेमामुळे ते पुन्हा ताकदीनं उभे राहिले. त्यांनी आदर्श सैनिक फाउंडेशन सुरू केलं. या माध्यमातून ते आता देशभरातील दिव्यांग सैनिकांना मदत करतात. "मला देवानं पुनर्जन्म दिला तर मी देश सेवेसाठी स्वतःला अर्पण करेन," असं नायक दीपचंद अभिमानानं सांगतात.
हेही वाचा :
- कारगिल विजयाची 25 वर्षे: पंतप्रधान मोदी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार - Kargil Vijay Diwas
- Kargil Vijay Diwas 2023: अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनने भारतीय सैन्याच्या शौर्याला केला सलाम...
- Kargil Vijay Diwas : कारगीलमध्ये जवानांनी शत्रूंच्या छातीवर फडकवला तिरंगा, कारगिल विजय दिनी राजनाथ सिंह झाले नतमस्तक