कोल्हापूर Jyotiba Chitra Yatra 2024 : राज्यासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात, गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा यात्रेचा (Jyotiba Yatra) आज मुख्य दिवस असून जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झालाय. पाच वाजता महाभिषेक महापूजा, तर 10 वाजता धुपारती सोहळा पार पडला. हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता श्री जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर उधळण करत गगनभेदी सासनकाठ्यांनी जोतिबा डोंगर परिसर फुलून गेलाय.
मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल : तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज मंगळवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी झाले. पहाटे ५ वाजता शासकीय महाअभिषेक पार पडला. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा झाली. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचं पूजन पार पडले. तर यानंतर सासनकाठीच्या मिरवणुकीस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीनं मिरवणुकीस प्रारंभ झाला. मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या असून चांगभलंच्या गजरानं अवघा डोंगर दुमदुमून गेलाय. पहिला मान निनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा आहे. तसंच मानाच्या 18 सासनकाठ्या सहभागी झाल्या, चैत्र यात्रेच्या निमित्तानं राज्यासह परराज्यातील सुमारे 96 सासनकाठ्या सहभागी झाल्यात.
भाविकांसाठी मोफत सोय : आज जोतिबा यात्रेसाठी तब्बल आठ लाख भाविक डोंगरावर येणार असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आलीय. यामुळं यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जय्यत तयारी केलीय. ठिकठिकाणी पोलीस तसंच सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत असून डोंगरावर ये जा करण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तर यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं मोफत अन्नछत्राचं आयोजन करण्यात आलं असून एसटी महामंडळाच्यावतीनं २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आलीय.
हेही वाचा -