ठाणे MVA Face of Chief Minister : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित व्हावा अशी ठाकरे गटाची मागणी होती. मात्र, त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिलाय. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात कोण?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता "शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं? हे शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही," असं फडणवीस म्हणाले. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? : जितेंद्र आव्हाड यांनी आज (7 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी केवळ दर्शनासाठीच इथं आलो होतो, असंही स्पष्ट केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "शरद पवार हे काय विचार करतात हे त्यांच्या पत्नीला देखील माहित नसतं. उभ्या महाराष्ट्राला देखील ते 70 वर्षात समजलेलं नाही", असं ते म्हणाले.
खोलवर झालेल्या जखमेचा व्रण कधीच जात नाही : शुक्रवारी गडचिरोलीत बोलत असताना "घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक केली, तुम्ही ती करू नका", असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "खोलवर झालेल्या जखमेचा व्रण कधीच जात नाही. 22 वर्षांपूर्वी मी ट्रेनमधून पडलो होतो. तेव्हा झालेल्या जखमेचं व्रण माझ्या हातावर अजूनही आहे. माझ्या चेहऱ्यावरील जखमा देखील उभ्या आयुष्यात जाणार नाही. खोलवर जखम वरुन बघितल्यावर नीट झालेली दिसते. पण तिचा व्रण कधीच जात नाही."
हेही वाचा -
- 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावानं आग्रही असलेले शरद पवार यंदा मागे का? - Face of Chief Minister
- महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? रमेश चेन्नीथला म्हणाले... - Face Of Chief Minister
- महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? जाणून घ्या नेत्यांचं मत काय? - face of chief minister