मुंबई Jayant Patil Attack On Mahayuti : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे. त्यातच आता जागा वाटपात एकनाथ शिंदे गटावर झालेला अन्याय, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा यामुळे नाराज शिंदे गटातील नेत्यांची खदखद बाहेर पडत आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी याला वाट मोकळी करुन देत भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तर कीर्तीकर यांच्या वक्तव्यानंतर "कुठल्या दबावाखाली शिवसेना फोडण्यात आली," हे स्पष्ट झालं, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
केंद्रीय यंत्रणांचा तपास भाजपाची नवी संस्कृती : लोकसभा निवडणूक 2024 प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपात नवीन मुद्दे समोर येत आहेत. त्यातचं आता महायुतीत घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनीच भाजपाला घरचा आहेर दिला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रचार सभेत बोलताना थेट भाजपा केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. "विरोधी पक्षांच्या मागं केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणं ही नवीन संस्कृती भाजपानं सुरू केली," असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणं "कलम 370 रद्द करणं, राम मंदिर उभारणी, वस्तू सेवा कर अशी चांगली कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत. परंतु त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाब आला असल्यानं त्यांनी अबकी बार 400 पार चा नारा देण्याऐवजी संपूर्ण संसद ताब्यात घ्यावी. परंतु मित्र पक्षांचाही मान त्यांनी राखायला हवा," असा सल्लाही गजानन कीर्तीकर यांनी दिला आहे. "नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं हे फक्त भाजपाचे स्वप्न नसून त्यामध्ये मित्र पक्षांचाही सहभाग आहे. शिवसेना शिंदे गटाची एक मतपेढी असून बाळासाहेब ठाकरे यांनी खेड्यापाड्यापर्यंत यासाठी संघटना बांधणीचं काम केलं. त्या कारणानं आमचा मान सुद्धा राखला पाहिजे," असंही गजानन कीर्तिकर यांनी सुनावलं आहे.
माझ्या मुलावर चुकीची कारवाई : गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीबद्दल सुद्धा कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, "या खिचडी घोटाळ्यात काही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारी सुद्धा खासगीमध्ये कबूल करत आहेत. करोनामध्ये अनेक जंबो उपचार केंद्र सुरू केली गेली. त्यासाठी वैद्यकीय साहित्याचा मोठा पुरवठा केला गेला. हा पुरवठा करण्यासाठी संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली होती. या कंपनीसाठी पुरवठा करण्याचं काम हे अमोल कीर्तीकर यांनी केलं. त्यामध्ये नफा झाला. तो मोबदला धनादेशाद्वारे सर्वांना देण्यात आला. त्यावर प्राप्तिकर ही भरण्यात आला, असं सांगत गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याची बाजू लावून धरली आहे. तसेच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून माझ्या मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र फोडण्याचं काम कशा पद्धतीने झालं : गजानन कीर्तिकर यांच्या मनातील खदखद बाहेर पडल्यानंतर याचा पूर्ण फायदा महाविकास आघाडी घेणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, "गजानन कीर्तिकर यांचं जे बोलणं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो संपूर्ण पक्ष आहे, यांना कशाचा धाक दाखवला आहे. याचा अनुभव गजानन कीर्तीकर यांनी सांगितला आहे. गजानन कीर्तिकर यांचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कशा पद्धतीनं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं गजानन कीर्तिकर यांचं म्हणणं गांभीर्यानं घ्यावं, अशी आमची जनतेला विनंती आहे," असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
शिंदे गटाला फरफटत जावे लागत आहे : गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यावर अद्याप भाजपाकडून कुठल्याही प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी सुद्धा महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. कथित खिचडी घोटाळ्यात पुत्रा वर होत असलेल्या ईडीच्या कारवाईनं गजानन कीर्तिकर त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडं पुत्राच्या विरोधात लढण्यास त्यांनी नकार दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या सर्व 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात अपयश आलं आहे. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी, खासदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करत भाजपातील केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. गजानन कीर्तिकर यांची ही सुरुवात असली तरी पुढे याचा मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :