चंद्रपूर International Tiger Day 2024 : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. गावाच्या वेशीवर वाघाच्या (Tiger) हल्ल्यात अनेकांचा मृत्यू होतो. वाघ-बिबट हा आपल्या गावाच्या आजूबाजूला मुक्तसंचार करत आहे याची गावकऱ्यांनी कल्पना नसते. त्यामुळं हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात नाहक लोकांचा जीव जातो. यावर मात करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 'एआय' (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) चा अत्याधुनिक प्रयोग केला जात आहे. या मदतीनं मानवाचा जीव वाचविण्यास मोठी मदत मिळत आहे. सध्या सहा गावांत ही यंत्रणा राबविण्यात येत असून आणखी समस्या असलेल्या 31 गावांत ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
मानव वन्यजीव संघर्षाच्या अनेक घटना : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही कमालीची वाढली आहे. जितके वाघ हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत त्यापेक्षा अधिक वाघ हे इतरत्र पसरलेल्या जंगलात आहे. त्यामुळं जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष देखील शिगेला पोचला आहे. जंगलाच्या आजूबाजूला वाघ-बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. तर गावकऱ्यांना देखील जंगलातील परिसरात ये-जा करावी लागते. विशेषता गुराढोरांना चारावण्यासाठी जंगला लगतच्या परिसरात अनेकांना जावे लागते. यात मानव वन्यजीव संघर्षाच्या अनेक घटना घडतात. यामुळं वनविभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तर तृणभक्षी प्राण्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताच्या बाजूला विद्युत तारा सोडून कुंपण करतात. यात बरेचदा वाघ किंवा बिबट्याचा मृत्यू होतो. या घटना चंद्रपूर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
पंतप्रधान मोदींकडून 'एआय' प्रयोगाचं कौतुक : वाघाची आकडेवारी कमी करण्याचं मोठं आव्हान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वनविभाग समोर उभं ठाकलं आहे. त्यातच आता एक नवा पर्याय म्हणून गावकऱ्यांना वाघ आणि बिबटपासून सावधान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. यासाठी सर्वप्रथम ताडोबा क्षेत्रातील सितारामपेठ या गावाची निवड करण्यात आली. हा बफर क्षेत्रात असल्यानं येथे वाघांचा मुक्तसंचार आहे. वाघांच्या हल्ल्यात अनेक लोकांचा जीव देखील गेला आहे. त्यामुळं या गावात सर्वप्रथम प्रयोग केला गेला. या गावाच्या सभोवताल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानयुक्त असलेले सहा कॅमेरे लावण्यात आले. याचा यशस्वीपणे प्रयोग झाला. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. 'मन की बात' मध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख करत या प्रयोगाचं कौतुक केलं होतं. यानंतर काटवन, पडझरी, भदूरणा, मारोडा आणि रत्नापुर या गावात ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
सीतारामपेठ येथे 291 वेळ दिला वाघाचा अलर्ट : सितारामपेठ या गावात ही यंत्रणा बसवल्यानं याचा मोठा फायदा गावकऱ्यांना झाला. या यंत्रणेमुळं 291 वेळा वाघ, 215 वेळा बिबट आणि 348 वेळा अस्वल या जनावरांचा संचार गावभोवती असल्याचा अलर्ट देण्यात आला होता.
31 गावात लागणार एआयची यंत्रणा : या संपूर्ण प्रयोगामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हायला मदत मिळाली आहे. अशातच आता वनविभागाने 31 गावांमध्ये यंत्रणा राबविण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडं पाठवला आहे. या 31 गावांमध्ये 117 कॅमेरे लावण्यासाठीचा प्रस्ताव आहे. याला मंजुरी मिळतात अशा समस्याग्रस्त गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा फायदा होणार आहे.
अशी काम करते एआय यंत्रणा : ज्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे आणि जिथे जंगल लागून आहे अशा ठिकाणी आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा असलेले कॅमेरे लावण्यात येतात. हे कॅमेरे सौर उर्जेवर चालतात. 24 तास निघराणी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठेवली जाते. अशातच या कॅमेराच्या दृष्टीक्षेपात बिबट, वाघ आणि अस्वल असे हिस्त्र प्राणी आल्यास त्याचा लगेच फोटो काढला जातो आणि हा फोटो संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनविभागाच्या यंत्रणेकडं जातो. यानंतर वनविभागाच्या माध्यमातून गावकऱ्यांना याबाबत सावध केलं जातं. गावात कुठल्या ठिकाणी वाघ आणि बिबट आहेत याची माहिती गावकऱ्यांना दिली जाते. यामुळं मानव वन्यजीव संघर्ष टाळता येऊ शकतो.
हेही वाचा -