नाशिक Kavita Raut Allegations : आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या कविता राऊत यांना अद्यापही सरकारनं नोकरी दिली नाही. त्यामुळे कविता राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आपण आदिवासी असल्यानं अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावललं जात आहे. सरकार आपल्याबरोबर दुजाभाव करत असल्याचा आरोप धावपटू कविता राऊत यांनी केला आहे. नाशिकला आदिवासी समाजाच्या एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी कविता राऊत यांनी आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली.
धावपटू कविता राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून त्यांनी सहभाग घेतला. तसेच कविता राऊत यांना खेळाडूंसाठी देण्यात येणारा अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे. मात्र असं असताना देखील शासकीय धोरणाप्रमाणं नोकरीसाठी अनेकदा अर्ज करुन देखील माझ्या अर्जांकडं हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप कविता राऊत यांनी केला आहे. मी आदिवासी असून माझ्या मागं कोणी गॉडफादर नसल्यानं नोकरी मिळतं नाही, अशी खंतही कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासी असल्यानं होत आहे अन्याय : आदिवासी असल्यानं अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावललं जात आहे. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप कविता राऊत यांनी केला आहे. धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी देण्यात आली. आपल्याला मात्र 10 वर्ष पाठपुरावा करूनही हाती काहीच मिळालं नसल्याचा दावा धावपटू कविता राऊत यांनी केला आहे. आपण आदिवासी असल्यामुळे मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. अनेकांना माझ्या पेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप धावपटू कविता राऊत यांनी केला आहे.
आमदारही म्हणतात अन्याय होत आहे : आंतरराष्ट्रीय धावपटू कविताच्या आरोपावर आदिवासी लोकप्रतिनिधीनींही सरकारला लक्ष्य केलं आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जे पी गावीत यांनी देखील सरकार आदिवासी, बिगर आदिवासी असा भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. आदिवासी नागरिकांवरील अन्याय थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही आजी-माजी आमदारांनी दिला आहे.
काय म्हणाल्या कविता राऊत ? : मी आदिवासी आहे म्हणून मला डावललं जात आहे. माझ्या मागं कोणी गॉडफादर नाही, माझी ज्युनिअर खेळाडू ललिता बाबर यांनी माझ्याबरोबर पदवी प्राप्त केली. माझ्यापेक्षा कमी पदकं असताना देखील त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. पंरतू, माझ्यासोबत जातीयवाद करुन 10 वर्षांपासून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे, यांची मला खंत वाटतं आहे, असंही कविता राऊत यांनी म्हटलं आहे.
कविता राऊत यांची कामगिरी :
- 2009 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5000 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकलं
- चीनमधील ग्वांगझू इथं 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये रौप्य पदक
- 2010 आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये रौप्य पदक
- 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 10,000 मीटरमध्ये कांस्यपदक
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलेचं पहिलं वैयक्तिक ट्रॅक पदक
- महिला मॅरेथॉनमध्ये 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता
- 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा शिव छत्रपती पुरस्कार
हेही वाचा :