नाशिक (इगतपुरी) Igatpuri Water Shortage : महाराष्ट्राची पॉंडिचेरी म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो; मात्र यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसानं ओढ दिल्यानं येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. या भागातील सर्वच विहिरींनी पाण्याविना तळ गाठला असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून संघर्ष करावा लागत आहे. तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.
प्रशासनाने जागे होऊन तहान भागवावी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात पाणी टंचाईच्या झळा बसत असून गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर जानेवारी महिन्यातच आटली होती. प्रशासनाने मोजकेच पाण्याचे टँकर दिले होते; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून टँकरही आले नाही. तसेच अजूनही तालुक्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही. पावसाने अनेक भागात पाठ फिरवली आहे. याही आदिवासी गावात हीच परिस्थिती आहे; त्यामुळे येथील नागरिकांना तळ गाठलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन घोटभर पाण्यासाठी उतरावे लागत असून ओंजळीने पाण्याच्या डबक्यात पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या आदिवासी बांधवांची तहान भागवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गढून पाणी उकळून प्यावं लागतं : जून महिना संपत आला तरी पाऊस नाही. जानेवारीपासून या विहिरीत पाणी नाही. सुरुवातीला काही दिवस टॅंकरने या विहिरीत पाणी टाकले; मात्र आता कित्येक दिवसांपासून विहिरीत पाणी नसल्यानं पाण्यानं तळ गाठला आहे. अशात आमच्यातील काही नागरिक विहिरीत उतरतात. एक हंडाभर पाणी प्रत्येकाला मिळते तेही पाणी गढूळ असते. त्यामुळे घरी जाऊन पाणी उकळून मग प्यावे लागते; मात्र तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही. आमच्याकडे दररोज टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा ही आमची मागणी आहे, असं एका महिलेनं सांगितलं.
हेही वाचा:
- पुण्यात आढळला झिकाचा चौथा रुग्ण, महापालिकेचा आरोग्य विभाग लागला कामाला - Zika Virus In Pune
- NEET प्रकरणी लातूरातून एप्रिलमध्ये NTA ला पत्र, लातूरच्या दिलीप देशमुखांची माहिती - NEET Paper leak Case
- मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज: वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच - Traffic on Mumbai Nashik highway