मुंबई Jitendra Awhad : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. बजेटवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि टीका टिपण्णी होत असताना, आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारचा विरोधात घोषणाबाजी केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज अजित पवार यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रावरून टीका केली.
सत्तेसाठी भूमिका बदलते : कित्येक वर्ष झाली देवेंद्र फडणवीस यांनी कधी विचारांशी तडजोड केली नाही. मात्र, अजित पवार हे सतत भूमिका बदलत असतात. त्यांनी सत्तेसाठी भूमिका बदलली आहे. याचा अर्थ ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला. मी अजित दादांना कधीच अरे तुरे केले नाही. मी अपघाताने राजकारणात आलो असं अजित पवार म्हणतात. पण ज्याच्यामुळे ते राजकारणात आले, त्यांचा सध्या पत्रात कृतज्ञता म्हणून उल्लेख ही नाही ही मोठी शोकांतिका आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
आम्हाला टपली माराल तर आम्हीही तसेच उत्तर देऊ : आम्ही वैयक्तिक टीका केली नाही, करणार नाही. पण जर तुम्ही समोरून आमच्यावर एकेरी उल्लेख करत वैयक्तिक टीका करत असाल तर आम्हाला आरे ला कारे म्हणावे लागेल. उत्तर द्यावेच लागेल, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसंच, तुम्ही आम्हाला जर टपली मारणार असाल तर आम्हीही त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देऊ, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जर वैयक्तिक टीका केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
संसदेचे महत्त्व मोठे आहे : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी होत आहे. परंतु, त्या एक उत्तम खासदार आहेत. संसदेचं महत्त्व खूप मोठं आहे. जेव्हा संसदेत मधु दंडवते, बॅ. नाथ पै बोलत असत, तेव्हा स्वतः तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जेवण सोडून यांची भाषणं ऐकण्यासाठी येत असत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. त्यांची उपस्थितीही अधिक आहे. त्यांना उत्तम संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यावर खालच्या भाषेत जर टीका केली तर ती आम्हाला सहन होणार नाही असंही आव्हाड यावेळी म्हणालेत.
हेही वाचा :
1 पंतप्रधान मोदींची आज यवतमाळमध्ये सभा; मात्र सभास्थळी खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स
2 गुजरात किनारपट्टीवर संशयित इराणी बोट ताब्यात; 1000 कोटींपेक्षा अधिकचे अंमली पदार्थ जप्त