पुणे HSC Exam 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12 वी च्या लेखी परीक्षेला आजपासून सुरवात झालीय. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा तणावमुक्त द्यावी यासाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन, साखर वाटून स्वागत करण्यात आलंय.
राज्यातील 3320 केंद्रावंर परिक्षेचं आयेजन : यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यात 8,21,450 विद्यार्थी व 6,92,424 विद्यार्थीनींचा समावेश आहे. एकूण 10,497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याध्यर्थ्यांसाठी 3320 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलीय.
काय म्हणाले विद्यार्थी : यावेळी परिक्षार्थी म्हणाले की, "आजपासून आमची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झालीय. पण कुठेतरी दडपण आहे. पहिला पेपर असल्यानं मनात भीती आहे. पण ती आता शिक्षकाकडून औक्षण झाल्यावर दूर झालीय. आता निश्चितच चांगला पेपर जाईल."
कॉपीमुक्त परिक्षेसाठी प्रयत्न : बोर्डानं जी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार आम्ही आमची पूर्ण तयारी केलीय. शाळा परिसरात 500 मीटर पर्यंत कुठंही झेरॉक्स सुरु राहणार नाही. तसंच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं भावे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उमेद सय्यद यांनी सांगितलंय.
10 समुपदेशकांची नियुक्ती : परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भितीनं मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच राज्य मंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलीय.
हेही वाचा :