मुंबई Unseasonal Rain : एकीकडं लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आणि राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे उन्हाळा असल्यामुळं तापमानाचा पारा ही वाढलाय. तर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं मागील दोन-चार दिवसांमध्ये हजेरी लावल्यानंतर आज मुंबईत दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं होतं. यानंतर सोसाट्याचा वादळीवारा आल्यामुळं मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. तसंच मुंबईतील घाटकोपर आणि वडाळा इथं दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
घाटकोपरमध्ये बॅनर कोसळला : दुपानंतर दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई तसंच पश्चिम उपनगरामध्ये अचानक सोसाट्याचा वादळीवारं आल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली. याच दरम्यान मुंबईतील घाटकोपर इथं एक भला मोठा होर्डिंग कोसळला. या होर्डिंग्स खाली अनेक मुंबईकर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा होर्डिंग पेट्रोल पंपच्या बाजूला कोसळल्यामुळं या होर्डिंगच्या खाली काही मुंबईकर गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. तसंच या होर्डिंग खाली 90 ते 100 वाहनं अडकली असून यामुळं 35 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय.
वडाळ्यात पार्किंगचा भाग कोसळला : दुसरीकडं मुंबईतील वडाळा इथं इमारतीच्या पार्किंगचा काही भाग सुसाट वाऱ्यामुळं खाली कोसळला. जेव्हा पार्किंगचा भाग खाली कोसळला तेव्हा खाली अनेक गाड्या होत्या. या गाड्यावर हा भाग कोसळल्यामुळं आठ ते दहा जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. खासदार राहुल शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केलीय. तर या वेगळ्या दोन घटना हे अतिशय दुर्दैवी आहेत. याची या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि जखमीवर योग्य पद्धतीनं उपचार होतोय की नाही याची काळजी घेतली जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा :