मुंबई Malad West Hoarding Collapsed : मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडलीय. ही घटना चाचा नेहरू मैदान परिसरात घडली असून या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर शताब्दी रुग्णालयात उपचारानंतर जखमीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी संबंधित विकासकाविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवलाय. तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमुळं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे.
मालाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील चाचा नेहरू उद्यानात ही घटना घडली. यावेळी अचानक काही फूट लांब होर्डिंग खाली कोसळले. या घटनेची माहिती मालाड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केलं. तर मालाड पोलीस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात साइटच्या बिल्डरविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 336, 337 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय.
बीएमसीच्या सूचनेवरून हा फलक काढण्यात आला : मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "बिल्डरनं त्याच्या जागेवर हे होर्डिंग लावलं होतं. बीएमसीनं एक सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणानुसार तेथे लावलेले फलक बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं. त्यानंतर बीएमसीनं याप्रकरणी विकासकाला नोटीस दिली. नोटीसच्या आधारे बिल्डरनं जय किरण कन्स्ट्रक्शन साइटच्या विकसक आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत."
हेही वाचा -
- घाटकोपर होर्डिंग प्रकरण: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या इंजिनिअरला मुलुंडमधून केली अटक - Ghatkopar Hoarding Case
- कायदेशीर निकष पाळून होर्डिंग उभारण्याची परवानगी द्या, न्यायालयाची सिडकोला सूचना - Mumbai HC On Hoarding Policy CIDCO
- घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case