कोल्हापूर Kolhapur Religious Riots : देशाला सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या गावात गेल्या वर्षी याच दिवशी दोन समाजात तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्यानं धार्मिक वाद उफाळून आला होता. या घटनेने पुरोगामी कोल्हापूर अशी ओळख असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीत पुन्हा अशी घटना नको म्हणून या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम व्यावसायिक मनोमन प्रार्थना करत आहेत.
दुकानांवर तुफान दगडफेक : गतवर्षी 6 जूनला राज्यासह कोल्हापुरात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असताना मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणातून कोल्हापुरातल्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर काही संघटनांनी आंदोलन केलं. पोलीस यंत्रणेनं मध्यस्थी करूनही हा वाद मिटला नाही. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागलं. कोल्हापूर शहराचे नाक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या जमावानं हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानांवर तुफान दगडफेक केली. जमाव दुकानाकडे येत असल्याचं पाहून याच परिसरातील किरकोळ कपड्याचे विक्रेते साजिद शिकलगार यांनी आपल्या दुकानाचा दरवाजा तात्काळ बंद केला.
जपलेल्या दुकानांवर दगडफेक : आक्रमक झालेल्या जमावाने त्यांच्या दुकानावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत दुकानाचे नुकसान झाले. मात्र आपलेच बांधव तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या दुकानावर दगडफेक करत आहेत. ही घटना गेली 40 वर्ष याच ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या सलीम भाईंच्या काळजाला भिडणारी होती. भीतीपोटी दुकानात लपून बसलेल्या सलीम शिकलगार यांना आजही ती घटना आठवल्यानंतर वेदना होत असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हिंसाचारात महाराष्ट्र अव्वलस्थानी : राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 या एकाच वर्षात हिंसाराच्या प्रकरणात राज्यात तब्बल 8 हजार 212 गुन्हे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्याही अधिक हिंसाचारात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागत असल्याने धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटना टाळायला हव्यात. 7 जून 2023 रोजी कोल्हापुरातील हिंसाचाराची घटना घडल्यानंतर राज्याबाहेर आणि देशातील अनेकांनी कोल्हापुरात अशी घटना घडली आहे का? याबाबत चौकशी केली. कोल्हापुरात असं काही घडू शकतं हे अनेकांना अनाकलनीय होतं. मात्र, या हिंसाचारानंतर कोल्हापूरकरांना राजर्षी शाहूंच्या विचारांनी सामाजिक एकता टिकविण्यासाठी बळ दिले.
गुण्या गोविंदानं राहूया, राजर्षींचा वारसा जपूया : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातून करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला असणारे पान शॉप गणी तांबोळी आणि दिलीप चौगुले हे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र चालवतात. गेली 23 वर्ष या दोघांच्या मैत्रीत कधीही जातीच्या भिंती उभारल्या नाहीत. पुरोगामी कोल्हापुरातील अनेक जण धर्मापलीकडची मैत्री म्हणून या दोघांचं उदाहरण देतात. "आम्ही सर्वधर्मीय एकदिलानं राजर्षी शाहूंचा वसा पुढे चालवू ," असा निर्धार यावेळी दिलीप चौगुले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन सुरू केले मुस्लिम बोर्डिंग- राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली होती. यामधून मुस्लिम बांधवांना शिक्षणाच्या संधी निर्माण करून त्यांचा विकास साधणे हा हेतू होता. शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग इन्स्टिट्यूटमध्ये 10 गरजू मुस्लिम मुलांना प्रवेश दिला. त्यामधील शेख मोहम्मद युनूस अब्दुल्ला यांना शिक्षण पूर्ण होताच प्रमुखपदी नियुक्त केले.
हेही वाचा :
- महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 26 नवे खासदार मराठा, तर 9 ओबीसी: वाचा संपूर्ण लिस्ट फक्त एका क्लिकवर.... - MP Equation Maharashtra
- चलो बुलावा आया है! लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राणा दांपत्याला दिल्लीत बोलावणं, केंद्रात मंत्रिपद मिळणार? - Navneet Rana Ravi Rana Delhi Visit
- अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024