मुंबई Mega Block : मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळं रस्ते वाहतुकीवर ताण पडलाय. पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं. त्यातच मुलुंड ऐरोली मार्गावर सकाळी ट्रेलर उलटल्यानं त्याचा फटका बसून वाहतुकीचा वेग मंदावलाय.
प्रवाशांची आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था : मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळं रेल्वे स्थानकात गर्दी उसळली असतानाच अनेक प्रवाशांनी सावधगिरीचा मार्ग म्हणून रेल्वे प्रवासाऐवजी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडल्यानं रस्तेवाहतुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झालाय. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपापल्या दुचाकी व चारचारी वाहनांचा पर्याय निवडल्यानं पूर्व द्रुतगती महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आले. त्यामुळं रेल्वे प्रवास टाळण्याचा विचार केलेल्या प्रवाशांची आगीतून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती निर्माण झाली.
पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी : मध्य रेल्वेनं मेगा ब्लॉकची आधीच घोषणा केल्यानं व गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा आवाहन केल्यानं मुंबईतील लोकल प्रवासाला सरावलेल्या प्रवाशांना रेल्वेच्या आवाहनाचा उपनगरीय रेल्वे सेवेवर किती मोठा परिणाम पडू शकतो याची जाणीव झाली. त्यामुळं ज्या प्रवाशांना शक्य होतं, त्यांनी स्वतःच्या दुचाकीनं किंवा मित्रांसोबत दुचाकीनं किंवा चारचाकी वाहनानं प्रवास करण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळं पूर्व द्रूतगती मार्गावर वाहनांची गर्दी झाल्याचं चित्र होतं. दुचाकीवरुन येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडी सोबतच प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाचा त्रास देखील सहन करावा लागत होता. पावसाचं आगमन अद्याप मुंबईत झालेलं नसल्यानं तसंच मान्सून पूर्व पाऊस देखील पडत नसल्यानं वातावरणात प्रचंड उष्णता असल्यानं दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. त्यातच काही ठिकाणी अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरु असल्यानं दुचाकीस्वारांना त्रास झाला.
रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यानं आज दुचाकीवरुन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पूर्व द्रूतगती महामार्गावर व शहरात देखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र कामावर जाणं आवश्यक असल्यानं कितीही त्रास झाला तरी जाणं भाग पडतं. आवश्यक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्यानं यापुढं लोकल सेवा सुरळीत चालेल अशी आशा आहे. - नासीर खान
कामाचा दिवस असल्यानं अडचणी : शुक्रवार हा कामाचा असल्यानं अनेकांना इच्छा असूनही सुटी घेता आलेली नाही. कामावर येण्याची अपरिहार्यता असल्यानं येनकेन प्रकारे चाकरमान्यांना कार्यालय गाठणं आवश्यक होते. उद्या शनिवार असल्यानं काही जणांना कामावरुन कामाची सुटी असेल, त्यामुळं उद्या आजच्या तुलनेत कमी प्रवाशांना या अडचणीला सामोरं जावं लागेल. रविवारी बहुसंख्य नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्यानं व रेल्वे प्रशासनाचा रविवार हा मेगा ब्लॉक घेण्याचा हक्काचा दिवस असल्यानं मुंबईकरांना त्याची नेहमीप्रमाणे सवय आहे.
हेही वाचा :