भंडारा Bhandara Rain Forecast : हवामान खात्यानं शुक्रवारी (19 जुलै) भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. दिवसभर पावसानं उघडीप दिली होती. मात्र, मध्यरात्रीपासून पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावलीय. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडत असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहताय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज (20 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. तर हा पाऊस आज दिवसभर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळं धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेत.
पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळं भंडारा, लाखनी साकोली, लाखांदूर, पवनी, या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालीय. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूर (241 मिलिमीटर) मध्ये बरसलाय. तर पवनी 197.8, भंडारा 106, लाखनी 96. 3, साकोली 73 तुमसर 40.2 आणि मोहाडी 55.6 मिलिमीटर इतका पाऊस झालाय.
19 रस्ते बंद : पावसामुळं पवनी, अड्याळ, लाखांदूर, साकोली तालुक्यातील 19 रस्ते रहदारी बंद करण्यात आलेत. तर भंडारा शहरातील रुक्मिणी नगर आणि वैशाली नगर येथील घरांमध्ये पावसाचं पाणी गेल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय. दरवर्षी पाऊस झाल्यानंतर या भागात पाणी साचतं. मात्र, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन या गोष्टीला गांभीर्यानं घेत नसल्यानं दरवर्षीच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
वैनगंगा नदी क्षेत्रात आणि गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं गोसे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाची 33 दारं उघडण्यात आलीत. यापैकी 13 दार 1 मीटरनं तर 20 दार अर्ध्या मीटरनं उघडण्यात आली असून यामधून 5022. 07 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळं नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलंय.
हेही वाचा -