मुंबई Maratha Reservation : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्या पद्धतीची अधिसूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Ordinance) यांच्या हस्ते जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आली. यानंतर मराठा समाजाचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे एक स्टंट होता, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
ओबीसी, खुल्या प्रवर्गावर अन्याय होऊ देणार नाही : मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं किती ज्ञान आहे? हे माहिती नाही. कारण जी अधिसूचना सरकारनं काढली आहे, त्या अधिसूचनेत सर्व काही जुनेच आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन एक स्टंटबाजी आहे. संविधानात योग्य आहे तेच मिळू शकतं. संविधानामध्ये दिलेल्या निकालाला आपण कसे चॅलेंज करू शकतो? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलांना विचारलाय. या अधिसूचनेनं हुरळूण जाण्याचं काही कारण नाही. थोडा धीर धरा, या अधिसूचनेविरोधात आपण न्यायालयात जाणार असून, सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही सदावर्ते म्हणाले.
सरकार झुकण्याचा प्रश्नच नाही : मराठा आंदोलनामुळं राज्य सरकार झुकलं असं म्हणतात. पण सरकार झुकण्याचं काही कारणच नाही. सध्या आंदोलनातील लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या व सोमवारपर्यंत वाट बघा, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणानंतर दिली. मराठा समाज मागास नाही. थोडे दिवस थांबा 'दूध का दूध, पाणी का पाणी' होऊन सर्वांच्या लक्षात येईल काय होतं ते, यासाठी मला रस्त्यावरची लढाई लढाईची काही गरज नाही. मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत, कारण त्या सर्व जुन्याच मागण्या आहेत. म्हणून यामध्ये सरकार झुकण्याचा काही प्रश्नच नाही, असं सदावर्ते म्हणाले.
३०७ सारखे गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत : ओबीसीमधून मराठ्यांना प्रमाणपत्र भेटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. 'वाचाल तर वाचाल' नाहीतर चुकीच्या मार्गानं एनर्जी, वेळेचा दुरुपयोग व स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्याव्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये काही नाही. सरकार मायबाप असतं. जरांगे यांनी सांगितलं की, सरकारनं सगे सोयरेबाबत अधिसूचना काढली. परंतु सगे सोयरे व रक्ताचे नाते याच्यामध्ये काय फरक आहे? रक्ताचं नातं असेल तरच ते सगे सोयरे होतात. म्हणून याला काही अर्थ नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ३०७ सारखे गुन्हे परत घेतले जाऊ शकत नाहीत. एसटीच्या काचा फोडल्या, माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, त्याचे पैसे कोणाकडून वसूल करणार? त्या आंदोलनामध्ये जे सहभागी झाले त्यांच्याकडून ते वसूल करायचे असतात. म्हणून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात असं मला वाटत नाही, असंही सदावर्ते म्हणाले.
राज ठाकरेंवर टीका : याप्रसंगी बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. ते म्हणाले, 'राज ठाकरे यांचं कर्तुत्व काय आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? हे मला सांगायची गरज नाही. त्यांनी टोलनाके बघावे. त्यासाठी किती पैसे मोजले ते बघावे. माझ्यावर टीका करण्या इतपत ते मोठे नाहीत. त्यांच्याबरोबर 'वन टू वन' करायला मी तयार आहे. परंतु, मनसेचे कोणी कार्यकर्ते, छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही.'
हेही वाचा -