सातारा : माळशिरसमधील मारकडवाडीनंतर सातारा जिल्ह्यात ईव्हीएमवरुन ठरावांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. कोळेवाडीच्या ग्रामसभेत बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं, असा ठराव झाल्यानंतर आता पाटण तालुक्यातील आबदारवाडी ग्रामपंचायतीनं ईव्हीएमवरच मतदान घेण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात ईव्हीएमवरुन ठराव घेण्याचं राजकारण चांगलंच रंगत आहे.
'या' कारणांवरून ईव्हीएमचं समर्थन : ईव्हीएमवरच मतदान का घेतलं जावं? यासंदर्भात आबदारवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत काही कारणं सांगितली. बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं झालं, तर कागदासाठी वृक्षतोड होईल. त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होईल. म्हणून ईव्हीएमवरच मतदान व्हावं. तसंच अशिक्षित मतदारांचं मत देखील बाद होणार नाही, असे मुद्दे मांडून ग्रामस्थांनी ईव्हीएमवरील मतदानाचं समर्थन केलं आहे.
अडीचशे ग्रामपंचायती घेणार ठराव : "पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून आबदारवाडी ग्रामपंचायतीत आम्ही ईव्हीएमवरच मतदान घेण्याचा ठराव केला आहे. शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून ईव्हीएमच्या समर्थनार्थ पाटण तालुक्यातील अडीचशेवर ग्रामपंचायतींमध्ये असा ठराव घेणार आहे," असं शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष आणि आबदारवाडीचे सरपंच विजय शिंदे यांनी सांगितलं. तसंच ईव्हीएम समर्थनार्थ ग्रामसभेनं बहुमतानं केलेला ठराव रितसर शासनाकडं सादर करणार असल्याची माहिती ग्रामसेविका सुजाता पवार यांनी दिली.
ग्रामपंचायतींमध्ये सुरू होणार ठरावांची स्पर्धा : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीचा संघर्ष असताना समोर आलेल्या निकालानंतर ईव्हीएमवर शंका घेतली जाऊ लागली. मारकडवाडीत बॅलेट पेपरवर प्रतिकात्मक मतदान घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीनं बॅलेट पेपरवर, तर आता पाटण तालुक्यातील आबदारवाडी ग्रामपंचायतीनं ईव्हीएमवरच मतदान घेण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामपंचायतींमध्ये अशा ठरावांची स्पर्धा लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :