मुंबई Amrit Yojana : राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, डबघाईला आलेल्या गाड्या, आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुद्द्यांवरून गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत होत्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि अन्य सुविधांचा भार उचलण्याची हमी राज्य शासनानं दिली. मात्र, दरमहा सुमारे 100 पेक्षा अधिक कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत होता. यामध्ये राज्य शासनाकडून राज्यातील विविध वर्गांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा भार अधिक होता. त्यातच एसटीचं भारमानही कमी झालं होतं, असं एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी भोसले यांनी सांगितलंय.
राज्य सरकारने उचलला भार : राज्य सरकारच्या वतीनं एसटीतून प्रवास करणाऱ्या विविध वर्गातील 17 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यामध्ये आमदार, खासदार, पत्रकार यांना सवलती आहेत. याशिवाय राज्य सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महिलांना 50 टक्के सवलत, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत अमृत योजनेअंतर्गत देण्यात आलीय.
ज्येष्ठांचा उदंड प्रवास : 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत दिल्यानं या नागरिकांच्या प्रवासामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालीय. एसटीचे भारमान यामुळं वाढत असून महिलांच्या प्रवासातही 50 टक्के सवलतीमुळं मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासात झालेली वाढ ही अत्यंत लक्षणीय आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2023 मध्ये एक कोटी ३२ लाख ज्येष्ठ नागरिकांनी सुमारे 65 कोटी रुपयांचा प्रवास केला होता. यंदा जानेवारी महिन्यात दोन कोटी नऊ लाख जेष्ठ नागरिकांनी सुमारे 103 कोटी रुपयांचा प्रवास केला आणि फेब्रुवारी महिन्यात एक कोटी 99 लाख नागरिकांनी सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रवास केला. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासावर यामुळं राज्य शासनाला ते एसटीला प्रतिपूर्ती म्हणून शंभर कोटी रुपये दरमहा द्यावे लागत आहेत. तर महिला आणि अन्य प्रवाशांना दिलेल्या सवलती पोटी सुमारे 200 कोटी रुपये असं मिळून 300 कोटी रुपये राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला दिले जात आहेत, यामुळं कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करता येत असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
सरकारच्या निर्णयाचा खूप फायदा : या संदर्भात बोलताना कोल्हापुरातील ज्येष्ठ नागरिक नामदेव भोसले म्हणाले की, राज्य सरकारच्या अमृत प्रवास योजनेचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. या योजनेमुळं आम्हाला देवदर्शनासाठी राज्यभरात कुठेही फिरता येतं. राज्यातील अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना यापूर्वी कधी काही कारणामुळं भेटी देता आल्या नव्हत्या. ते आता सहज शक्य होत आहे. वयाची 75 ओलांडल्यामुळं आता घरातील अन्य सदस्यांवर भार होण्यापेक्षा देवदर्शन करणं अथवा नातेवाईकांकडं फिरायला जाणं हे जास्त सोयीस्कर ठरतंय. त्यामुळं आम्ही या योजनेचा फायदा घेत आहे. त्यामुळं आमचा प्रवास निश्चितच वाढला आहे, असं भोसले यांनी सांगितलंय.
हेही वाचा -
- आली रे आली 'लालपरी' आली! तब्बल 76 वर्षांनी कोल्हापुरातील मानेवाडीत आली एसटी बस, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केलं स्वागत
- पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर; २७५ एसटी बसेस सोडल्यानं प्रवासी अन् विद्यार्थ्यांचे होणार हाल
- एसटी कर्मचारी बँक प्रकरण; बँक वाचवण्यासाठी सहकार खात्यानं हस्तक्षेप करावा, कामगार संघटनांची मागणी