मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेने मल्टी लेव्हल रोबोटिक पार्किंग टॉवर म्हणजेच MRPT प्रकल्प सुरू केलाय. या नव्या प्रकल्पांतर्गत संपूर्ण शहरात चार पार्किंग टॉवर उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची किंमत 504.19 कोटी रुपये असून, त्यासाठीचे कंत्राटदेखील देण्यात आलंय. त्यामुळे लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
पार्किंग टॉवर ही काळाची गरज : या नव्या प्रकल्पाबाबत पालिका प्रशासनाने म्हटले आहे की, उंच इलेक्ट्रोमेकॅनिकल पार्किंग टॉवर ही काळाची गरज आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त असून, त्यामुळे मर्यादित जागेत अधिक वाहने पार्क करता येऊ शकतात. हे नवे रोबोटिक पार्किंग स्टेशन कुठे बांधले जाणार याची जागादेखील निश्चित करण्यात आलेली असून, वरळी येथील पालिकेच्या अभियांत्रिकी केंद्रात, काळबादेवीच्या मुंबादेवी मंदिराजवळ, माटुंगा सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर आणि मुंबई उच्च न्यायालयाजवळील हुतात्मा चौकात या चार ठिकाणी पार्किंग टॉवर उभारले जाणार आहेत.
वरळीचे पार्किंग चारपैकी सर्वात मोठे : या चारपैकी वरळीच्या जागेवर एक जुनी इमारत असून, ती पाडून पार्किंग टॉवर उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय. उर्वरित तीन पार्किंग स्टेशनची जागा रिकामी आहे. वरळीचे पार्किंग चारपैकी सर्वात मोठे असेल, दोन तळघरांसह 23 मजले असतील. यात 640 कार आणि 112 दुचाकी सामावतील, असा अंदाज आहे. हे कंत्राट 208.16 कोटी रुपयांना देण्यात आलंय. मुंबादेवी पार्किंग 14 मजली असेल, 546 वाहनांची क्षमता असेल आणि त्याचे कंत्राट 122.61 कोटी रुपयांना देण्यात आलंय.
पार्किंग स्टेशनमध्ये 475 वाहने सामावणार : माटुंगा सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंग स्टेशन 18 मजली असेल. या पार्किंग स्टेशनमध्ये 475 वाहने सामावतील. या इमारतीच्या कामाचे 103.88 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तर हुतात्मा चौक येथील यांत्रिकी पार्किंगमध्ये चार तळ मजले असणार आहेत. या इमारतीची 176 कार आणि 18 दुचाकी पार्किंगची कॅपॅसिटी आहे. या इमारतीच्या कामाचे 69.54 कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले आहे. मल्टी-लेव्हल रोबोटिक पार्किंग टॉवरवर वाहन पार्क करण्यासाठी वाहनचालकाला तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. रोबोट वाहन उचलेल. मात्र, वाहनचालकांना पार्किंगसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. दरम्यान, पालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या, मुंबईत 40,000 वाहनांसाठी 28,500 सार्वजनिक पार्किंगमध्ये आणि 11,500 ऑन-स्ट्रीट पार्किंग जागा पालिका उपलब्ध करून देते. मात्र, वाढत्या मागणीमुळे मुंबईला किमान 10 पट अधिक पार्किंगची गरज आहे. त्यामुळे हा रोबोटिक पार्किंगच्या प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.
हेही वाचा-