पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. माला अशोक अंकोला (वय - 77 वर्ष) असं त्यांचं नाव आहे. त्यांचा खून झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुलीसोबत राहत होत्या : याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील प्रभात रोड येथील गल्ली नंबर 14 मधील 'आदी' या सोसायटीमध्ये माला अंकोला मुलीसोबत राहत होत्या. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घरात काम करणारी बाई त्यांच्या घरी आली. बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्यानं तिनं माला अंकोला यांच्या मुलीला फोन केला. त्यानंतर मुलीनं वडिलांना याची माहिती दिली. वडील घरी आले आणि त्यांनी दरवाजा उघडला असता माला अंकोला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
गळ्यावर चाकूनं वार केल्याची जखम : माला अंकोला यांच्या गळ्यावर चाकूनं वार केल्याची जखम होती. प्राथमिक अंदाजानुसार, आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.
सलील अंकोलांची क्रिकेट कारकीर्द : सलील अंकोला यांनी 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याच सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पदार्पण केलं होतं. सलील यांनी पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात एक विकेट घेतली होती, तर दुसऱ्या डावातही एकच विकेट मिळाली होती. त्याच वर्षी त्यांना वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सलील यांनी भारतासाठी 1 कसोटी सामना व 20 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात योगदान दिलं.त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 2 विकेट घेतल्या. 8 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ते फक्त 21 सामने खेळू शकले.
चित्रपटांमध्येही केलंय काम : सलील यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. ज्यात 'चाहत और नफरत', 'करम अपना अपना', 'विक्राल और गब्राल' सारख्या मालिकांचा समावेश आहे. 'कुरुक्षेत्र' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी 'पिता' (2002), 'चुरा लिया है तुमने' (2003) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं.
हेही वाचा