पुणे Prithviraj Chavan on future CM : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. तसंच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षानं उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढं केल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केलंय. "महाविकास आघाडीत जागावाटप लवकरच होणार आहे. त्यामुळं राज्याच्या संस्कृतीनुसार मुख्यमंत्रि पदाचा चेहरा पुढं केला जाणार नाही. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलय. तसंच राज्यातील जागावाटप, विविध पक्षाच्या यात्रांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.
वाटपाबाबत चर्चा : "महाविकास आघाडी वाटपाबाबत चर्चा करत आहोत. जे मतदारसंघ आमच्या वाट्याला येतील, तिथं आम्ही उमेदवारांची चाचपणी करणार आहोत. 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्ष मुंबईत मोठी रॅली काढणार आहे. तसंच 16 ऑगस्ट रोजी तिन्ही पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नेत्यांची बैठक देखील होणार आहे", असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल- "महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीकडं सक्षम उमेदवार असावा, असा आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला आहे. कोणत्या पक्षाची स्थिती काय आहे, हे पाहणं बाकी आहे. सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न करतील. पण शेवटी आम्ही अंतिम टप्प्यात आल्यावर जो निवडून येण्याची शक्यता असेल, त्या उमेदवाराला संधी दिली जाईल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 48 पैकी 31 जागा जिंकल्या. विधानसभेच्या 288 जागांपैकी महाविकास आघाडीला 183 जागा मिळत आहेत. मात्र, यावर आम्ही समाधानी नसून त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल", असं माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितलं. "येत्या विधानसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी असे मुद्दे असतील. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं त्यापेक्षा चांगलं यश विधानसभेत मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे," असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का :
- वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरुन श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना फटकारलं; काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? - Waqf Amendment Bill
- वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमविरोधी : खासदार असदुद्दीन ओवेसी यांची केंद्र सरकारवर टीका - Waqf Amendment Bill
- जनहित याचिकेद्वारे खेळ होतोय; तुमच्या सोयीनुसार भूमिका बदलतात, मुंबई उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांना फटकारलं - Mumbai High Court On Chitra Wagh