अमरावती Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत हे नागपूरवरून शुक्रवारी 3 वाजून 45 मिनिटांनी एमआयडीसीच्या 'उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी' या सोहळ्याला पोहोचले. कार्यक्रमाला आलेत. नागपूर येथील कार्यक्रम आटपून कारने अमरावती शहरातील मैफिलीन हॉटेल या कार्यक्रम स्थळी तब्बल 1 तास 45 मिनिटे उशिराने पोहोचले. उद्योग मंत्री उशिरा आल्यामुळे हा कार्यक्रम देखील लांबला. हा कार्यक्रम साडेचार वाजता आटोपता घेत उद्योग मंत्री थेट विमानतळाकडे रवाना झालेत.
विनंती करूनही वैमानिकाचा नकार- उद्योग मंत्री उदय सामंत यांना बेलोरा विमानतळावरून संभाजीनगर विमानतळावर नेण्याकरिता मुंबई येथील खासगी कंपनीचे विमान उतरलं होतं. हे विमान चार वाजता उड्डाण घेणार असताना उद्योग मंत्री मात्र तासभर उशिरानं विमानतळावर पोहोचले. त्यामुळे वैमानिकानं विमान उडवण्यास नकार दिला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वैमानिकाला विनंती केली. मात्र तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. विमान कंपनीच्या मालकांनीदेखील वैमानिकाचीच बाजू घेतली. अखेर उद्योग मंत्री उदय सामंत यांना संभाजीनगरला जाण्याकरिता कारशिवाय पर्याय नव्हता. दिलेल्या वेळेचं पालन केलं नसल्यानं उद्योग मंत्र्यांच्या झालेल्या गोचीची आता चर्चा रंगायला लागली आहे.
उशीर झाल्यानं उडाली तारांबळ निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर म्हणाले, "मंत्री महोदय तासभर उशिरानं विमानतळावर पोहोचल्यामुळे विमान कंपनीनं त्यांना संभाजीनगरला नेण्यास नकार दिला. विमान कंपनीच्या मालकाशीदेखील उद्योग मंत्री बोललेत. मात्र तासभर वेळ झाल्यामुळे कंपनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली," असे देखील अनिल भटकर यांनी स्पष्ट केलं.
तेरा वर्षांहून अधिक काळ विमानतळाचं चाललं काम-महाराष्ट्रातील सातवे मोठे शहर असणारे अमरावती हे विभागीय शहर आहे. अमरावती येथील बेलोरा विमानतळाचं पंधरा वर्षांपासून केवळ कामच सुरू राहिले होते. नांदेड ,लातूर, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया आदी ठिकाणी तालुका पातळीवर विमानतळ निर्माण झाले असताना अमरावतीमध्ये कामाला गती नसल्यानं लोकप्रतिनिधींवर टीका झाली होती. अमरावती विमानतळाच्या विस्तारित कामाचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 19 जुलै 2019 रोजी करण्यात आलं होतं. भूमिपूजन समारंभात अमरावती विमानतळ ऑगस्ट 2020 मध्ये सुरू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात विमानतळाच्या कामाला दिरंगाई झाली.
हेही वाचा -