नाशिक Nashik Road Firing : दोन दिवसांपूर्वी नाशिकरोडवरील मुक्तिधामच्या मागं असलेल्या हॉटेल मथुरा येथील नितीन सचदेव यांना रॉडनं मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काल विश्वचषकाचा सामना संपल्यानंतर दोन गटात तुफान राडा झालाय. या राड्यात गोळीबार तसंच कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून यात पाच जण जखमी झाले आहेत. एकीकडं भारताने विश्वचषक सामना जिंकल्याचा आनंद सुरू असताना दुसरीकडं नाशिकरोड भागात दहशत निर्माण झाली होती
दोन गटात तुफान राडा : नाशिकरोड परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे का?, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. दोन दिवसापूर्वी नाशिकरोड येथील मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे मालक नितीन सचदेव यांच्यावर कोयत्यासह रॉडनं हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काल 29 जून रोजी क्रिकेट विश्वचषक सामनादरम्यान भारतानं रोमहर्षक टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशात आनंदाचं वातावरण होतं. अशात नाशिकरोड येथील विहितगाव परिसरातील मथुरा चौकात विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना देवळाली गाव तसंच विहितगाव येथील गटात तुफान राडा झाला.
एकाला लागली गोळी : यात गोळीबार तसंच कोयत्यांचा वापर करण्यात आला. यात एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्यानं एकाला गोळी लागलीय. तर, या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली असून मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दोन आरोपींना अटक : दोन गटातील दोन व्यक्तींच्या पैशाच्या वादातून गोळीबार तसंच मारामारीची घटना झाल्याचं समजतय. गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार तसंच हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला कशामुळं झाला?, गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती सूत्रानं दिली आहे.
हे वाचलंत का :
- मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या; पोलीस घेताहेत मारेकऱ्यांचा शोध - Bapu Andhale Murder Case
- एकाच कुटुंबातील 5 जण भुशी धरणात गेले वाहून, बचावकार्य सुरू - 5 people washed in Bhushi Dam
- माझ्याकडं शब्द नाहीत, रोहितनं जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं; विश्वविजयानंतर काय म्हणाले रोहितचे कोच दिनेश लाड? - Dinesh Lad Exclusive Interview