मुंबई Adarsh Nagar Slum Fire : मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या आदर्श नगरमधील झोपडपट्टीत 17 फेब्रुवारीला पहाटे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत सुमारे 10-15 घरं जळून खाक झाली आहेत. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि मुंबई पोलीस घटनास्थळी हजर आहेत.
चाळीत आग लागली : अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, अग्निशमन दलाला पहाटे 3:55 वाजता फोनद्वारे आगीची माहिती मिळाली. गोवंडीतील आदर्श नगर भागातल्या बागनवाडी येथील चाळीत ही आग लागली. तळमजल्यावरील काही घरांसह सुमारे 15 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. या आगीत विद्युत तारा, घरगुती वस्तू आणि लाकडी फर्निचर यासह इतर वस्तूही जळून खाक झाल्या.
आगीचं कारण कळू शकलं नाही : सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. घटनास्थळी रुग्णवाहिकाही हजर आहे. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झालेलं नाही. आगीचं नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी येण्यापूर्वीच स्थानिक लोक पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
बोरिवलीतील आगीत 18 दुचाकी खाक : काल (16 फेब्रुवारीला) बोरिवली पश्चिम मोक्ष प्लाझा मॉलसमोरील मंगलकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली. इलेक्ट्रिक दुचाकीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. या आगीमध्ये 18 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी आग विझवली.
हे वाचलंत का :