मुंबई Vinod Ghosalkar : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात (Dahisar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह ४०-५० शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संविधान कलम १८८ आणि ३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.
महापालिका कार्यालयावर काढला मोर्चा : पोलीस हवालदार हरिश्चंद्र सावंत यांच्या तक्रारीवरून माजी आमदार विनोद घोसाळकर, आशिष मिश्रा सुधाकर राणे, उत्तम परब, सुमित सिंग, धनंजय कुलकर्णी, फिरोज खान, साजिदा शेख आणि इतर 40 ते 50 का पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनोद घोसाळकरांनी बुधवारी दहिसर येथील महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता. दहिसर नदीची अपुरी साफसफाई आणि रखडेलेली रस्त्यांची कामे यांच्यावर पालिकेच लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10.00 वाजता विनोद घोसाळकर यांच्यातर्फे दहिसर नदीची साफसफाई, नाले सफाई आणि अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण केली जात नाहीत. याबाबत आयुक्त, आर/उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेला जाब विचारणे आणि निवेदन देण्याकरीता आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
आचार संहितेचं उल्लंघन : या अंदोलनाचा मार्ग दहिसर पोलीस ठाणे हददीतील आनंदनगर मेट्रो ब्रिज येथून सुरु होणार आहे. न्यू लिंक रोड-दहिसर सब वे- मार्गे एम.एच.बी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण म्हात्रे रोड मार्गे आर/उत्तर विभाग दहिसर (पश्चिम) येथे समाप्त होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुशंगानं लागून केलेली आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू असल्यामुळं निवेदनकर्ते यांची मोर्चाची परवानगी कांदिवली येथील उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालय यांच्याकडून नाकारली होती. तसेच निवेदनकर्ते आंदोलकांकडून आदर्श आचार संहितेचं उल्लंघन होण्याची, वाहतुकीस अडथळा होवून किंवा अन्य कारणामुळं कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळं दहिसर पोलीस ठाण्याकडून देखील हे आंदोलन करण्यास मनाई करुन, दहिसर पोलीस ठाण्याने सी.आर.पी.सी.कलम 149 अन्वयेची नोटीस देण्यात आली होती.
गुन्हा दाखल : बुधवारी सकाळी 10.20 वाजताच्या सुमारास विनोद घोसाळकर यांच्यासोबत अशिष मिश्रा, सुधाकर राणे, उतम परब, सुमित सिंग, धनंजय कुलकर्णी, फिरोज खान, साजिदा शेख तसेच इतर 40 ते 50 पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. या कार्यकर्त्याच्या हातामध्ये "मुंबई महानगरपालिकेचा जाहीर निषेध", "दहिसरची तुंबई होणार याला जबाबदार काण?" अशा विविध आशये बॅनर होते. या कार्यकत्यांनी मोठ-मोठयाने " पन्नास खोके एकदम ओके", "या गद्दारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय", " घोसाळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है"," मुंबई महानगरपालिकेचा जाहीर निषेध" अशा विविध घोषणा देत दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आनंदनगर मेट्रो ब्रिज येथून मोर्चा सुरु केला होता. न्यू लिंक रोड-दहिसर सब वे मार्गे एम.एच.बी. पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मण म्हात्रे रोड मार्गे आर/उत्तर विभाग येथे नेवून दहिसर पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भाच्या सी.आर.पी.सी. कलम 149 या नोटीसचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा -