अमरावती- अचलपूर येथील प्रसिद्ध फिनले मिल ही विदर्भातील कापड निर्मितीत अग्रेसर असणारी गिरणी (मिल) कोरोना काळापासून बंद आहे. 11 हजार कोटी रुपये वर्षाला नफा असणारी ही मिल बंद पडल्यामुळे येथील हजारो कामगार बेरोजगार झालेत. शासकीय मिल बंद पडल्यानंतर 16 कामगारांनी आत्महत्या केली. आपल्याला न्याय मिळेल का, याची जवळपास 400 कामगारांना दिवाळीतदेखील प्रतिक्षा आहे.
कोरोना काळापासून मिल बंद - कोरोना काळापासून अचलपूर येथील फिनले मिल बंद आहे. मिल आज सुरू होईल. उद्या सुरू होईल, या अपेक्षेनं मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर आज मजुरी काम करण्याची वेळ आली. मिल सुरू होईल, या अपेक्षेत कामगारांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला नाही. अद्याप, भविष्यात ही मिल सुरू होईल. आपला फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या गिरणी कामगारांवर चक्क उपासमारीची वेळ आली.
- केवळ आश्वासनांची खैरात- "मिल लवकरच सुरू होईल. आपला उर्वरित पैसा मिळेल. दिवाळीत बोनस मिळेल, अशा आश्वासनांची खैरात सातत्यानं दिली जाते. वास्तवात मात्र कामगारांच्या पदरी निराशाच पडत आहे," अशी खंत गिरणी कामगार संघटनेचे सदस्य राजेश गौड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
अर्धा पगार कधी मिळणार? 2009 मध्ये सुरू झालेल्या फिनले मिलमध्ये प्रत्यक्षात 2011 मध्ये कापड निर्मिती सुरू झाली. 1000 कामगार या ठिकाणी कार्यरत असून अतिरिक्त दोन ते तीन हजार मजुरांना अप्रत्यक्ष रोजगार येथे उपलब्ध होता. "चार ते पाच वर्षांपासून काम बंद असल्यामुळे मधल्या काळात केवळ अर्धा पगार मिळायचा. उर्वरित अर्धा पगार मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, अद्यापही अर्धा पगार मिळाला नाही. दिवाळीकरिता कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले तर त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल. ही गिरणी बंद झाल्यामुळे काही मजुरांनी आत्महत्या केली. अशा संवेदनशील मुद्द्याचा शासनानं आणि लोकप्रतिनिधींनी योग्य विचार करावा. लोकप्रतिनिधींनी श्रेयवादापेक्षा माणुसकी म्हणून या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावं, असं गिरणी कामगार संघटनेचे सहसचिव गिरीश उघडे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. चार वर्षांपासून थकीत असणारा आमचा अर्धा पगार आणि बोनस तात्काळ मिळावा. आमची दिवाळी देखील सर्वांसारखी सुखद व्हावी," अशी अपेक्षा गिरणी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी व्यक्त केली.
या कामगारांनी केली आत्महत्या- 2020 पासून फिनले मिल बंद झाल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करणं कठीण झाला. 16 कामगारांनी आत्महत्या केली. अंकुश निरगुळे, किरण भुजाडे, सुनील कावरे, अंकित कामवीसदार, आदित्य मोहोड, प्रशांत ठाकूर, निलेश राऊत, निखिल हाडोळे, सुनील कोल्हापुरे, दिनेश जामुनकर, राहुल दरवणे, पियुष वाहुलकर, विजय दाभाडे , अमित डेरे, प्रवीण लकडे आणि सय्यद कलीम अशी आत्महत्या केलेल्या कामगारांची नावे आहेत.
व्यवस्थापकांचं स्पष्टीकरण- "केवळ अचलपूरची फिनले मिल ही बंद नाही. तर देशातील अशा एकूण 23 मिलमधलं काम केंद्र शासनानं थांबवलं. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून अचलपूर येथील फिनले मिलमध्ये काम बंद आहे. एकूण 485 कामगारांपैकी चारशे कामगारांना सध्या बंद करण्यात आलं आहे. काही कामगारांना मिल मधल्या मोजक्या कामासाठी ठेवण्यात आलं आहे," असं स्पष्टीकरण अचलपूर येथील फिनले मिलचे व्यवस्थापक अमित कुमार सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलं.
माजी राष्ट्रपतींमुळे सुरू झाली बंद- अचलपूर येथे विदर्भ मिल लिमिटेड या कंपनीमार्फत कापड निर्मिती उद्योगाला 1925 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी एकूण 2 हजार कामगार गिरणी मिलमध्ये कामाला होते. ही मिल पहिल्यांदा 1959 मध्ये बंद पडली. राज्य वस्त्रोद्योग महामंडळानं 1972 मध्येही मिल ताब्यात घेतल्यावर 1974 मध्ये मिल राष्ट्रीयकृत झाली. त्यानंतर ही मिल 2003 मध्ये बंद पडली. अमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी 2008 मध्ये फिनले मिलची पायाभरणी केली. सुमारे 326 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नव्यानं ही मिल उभारण्यात आली.
हेही वाचा-