छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Female doctor suicide : महिला डॉक्टरने ६ महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडलीय. १८ तास तपास घेऊनही अद्याप बाळाचा मृतदेह आढळून आला नाही. यासंदर्भात तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पूजा प्रभाकर व्हरकटे (वय ३०) असं मृत डॉक्टर महिलेचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळी तिने पाटेगाव रस्त्यावरील पुलावरून उडी घेतली होती. दोन तासांनी महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्यानं नेमकं कारण समोर आलं नाही, याप्रकरणाचा तपास करत असल्याचं पैठण पोलिसांनी सांगितलं.
रिक्षात बसून गेली होती डॉक्टर महिला : पैठण येथे चांगतपुरीस जायचं आहे म्हणून एका ६ महिन्यांच्या बाळासह महिला डॉक्टर रिक्षामध्ये बसली. पाटेगाव पूल आल्यानंतर गोदावरी नदीचं पाणी पहायचं आहे, असं म्हणत तिनं रिक्षा थांबवली. रिक्षातून उतरून बाळासह पाणी पाहात तिनं बळाला घेऊनच नदीत उडी घेतल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घडली. रिक्षा चालकानं ही माहिती पोलिसांना दिली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला, मात्र चिमुकल्या बाळाचा मात्र लागलेला नाही. पोलिसांनी तपास केला असता पूजा प्रभाकर व्हरकटे (वय ३०) असं मृत महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली.
पती-पत्नी आहेत डॉक्टर : पैठण येथील चांगतपुरी येथील डॉ. प्रभाकर व्हरकटे हे शहरात पत्नी डॉ. पूजा (बीएएमएस), ६ वर्षांचा मुलगा व ६ महिन्यांच्या बाळासह राहात होते. त्यांचा जुन्या तहसील परिसरात दवाखाना आहे. डॉ. पूजा या ६ महिन्यांच्या बाळासह मंगळवारी सायंकाळी घरातून निघाल्या होत्या. रिक्षा स्टॅण्डवर येऊन रिक्षात बसल्या. त्यानंतर ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच मदतकार्याला सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्या मदतीनं स्थानिक १५ ते २० मच्छीमारांना घेऊन गोदावरी पात्रात तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. त्यानंतर पूजाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदरील मृतदेह शहरातील शासकीय रुग्णालय नेण्यात आला. चिमुकल्या बाळाचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितलं. डॉ. पूजा यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलं नाही, मात्र तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा..