सातारा Father And Son Death: सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाण्यात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना वाई तालुक्यात घडली आहे. उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) आणि अभिजीत उत्तम ढवळे (वय १३), अशी बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी बाप लेकांची नावे आहेत.
बाप-लेकाचा बुडून मृत्यू : महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे खेळताना कोयना जलाशयात पडून दोन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला होता, तर दोन मुली बचावल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच वाई तालुक्यातील आंबेदरा आसरे (ता.वाई) येथे बाप-लेकाचा धोम धरणाच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. सध्या धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, कालवा बंद असल्यामुळं गेट टाकले आहे. त्यामुळं कालव्यात मोठा पाणीसाठा आहे.
पोहण्यासाठी गेल्यावर घडला अपघात : उत्तम ढवळे आणि मुलगा अभिजीत हे दोघे पितापुत्र कालव्यात दुपारी पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळं दोघेही पाण्यात बुडाले. त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि वाई आपदा ट्रेकर्स टीमला कळविण्यात आलं. त्यांनी शोध मोहीम राबवली असता दोघांचेही मृतदेह सायंकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं.
ट्रेकर्स जखमी : या शोध मोहिमे दरम्यान अशुतोष शिंदे (वाई) या ट्रेकर्सच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही बाप लेकांच्या मृतदेहाचे वाई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी, असा परिवार आहे.
हेही वाचा -