नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील शासकीय बंगल्याचा पत्ता बदलला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना देवगिरी या शासकीय निवासस्थानातून ते आपलं कामकाज करत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान रामगिरी बंगल्याबाहेर 'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस' नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर देवगिरी बंगल्याबाहेर उपमुख्यमंत्री 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं आज सकाळीचं रामगिरी आणि देवगिरी बंगल्याबाहेर लागलेल्या नावाच्या पाट्याही बदलण्यात आल्या आहेत.
पाच वर्षांचा वनवास संपला : 2014 ते 19 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचं वास्तव्य रामगिरी बंगल्यावर होतं. त्यानंतर पाच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून त्यांना दूर राहावं लागलं होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आता रामगिरीवर असे कयास लावले जात होते. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रामगिरी बंगल्याबाहेर त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली.
अजित पवारांच्या बंगल्याबाहेरील पाटी जैसे थे : महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना विजयगड हा शासकीय बंगला देण्यात आला होता. यावेळेस सुद्धा ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांच्या बंगल्यात बदल झालेला नाही, त्यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेली पाटी जैसे थे आहे.
हेही वाचा