ठाणे Argument Over Dog Urine : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका चारचाकी प्रवाशी वाहनावर पाळीव कुत्र्यानं लघुशंका केल्यानं कुत्र्याचा मालक आणि वाहन मालकात वाद झाला. या वादातून कुत्र्याच्या मालकानेच जाब विचारणाऱ्या चारचाकी वाहन मालकावरच जीवघेणा हल्ला केल्याची अजब घटना समोर आली. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी गावाच्या हद्दीत असलेल्या ऋतू रिव्हर इमारतीसमोर घडली.
'ही' आहेत हल्लेखोर आणि जखमीची नावे : जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर कुत्र्याच्या मालकासह त्याच्या ४ ते ५ साथीदारांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. मॉन्टी कारभारी, उमेश कारभारी उर्फ दाऊ आणि ४ ते ५ साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर साईनाथ मनोज गाईकने (वय ३०) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वाहन मालकाचं नाव आहे.
कुत्र्यानं चारचाकीवर केली लघुशंका : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाहन मालक साईनाथ गाईकने हे व्यापारी असून ते कुटूंबासह कल्याण पश्चिम भागातील काळा तलाव भागातील गणेश दुर्गा सोसायटीत राहतात. तक्रारदार गाईकने हे १९ जून रोजी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास कल्याण-पडघा मार्गावरून येत होते. त्यावेळी त्यांचा एक मित्र रस्त्यात म्हणजेच गांधारी गावाच्या हद्दीत असलेल्या ऋतू रिव्हर इमारतीसमोर भेटला. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी वाहन मालकाने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याच सुमारास हल्लेखोर मॉन्टी कारभारी यांचा पाळीव कुत्राही या ठिकाणी फिरत असतानाच तक्रारदार वाहन मालक यांच्या चारचाकी वाहनावर अचानक त्या पाळीव कुत्र्यानं लघुशंका केली.
वाहन मालकावर साथीदाराच्या मदतीने हल्ला : विशेष म्हणजे, कुत्र्यानं लघुशंका करताना तक्रारदार वाहन मालकाने पाहताच, त्यांनी कुत्र्याचा मालक मॉन्टी कारभारी याला लघुशंकाविषयी जाब विचारला होता. याच गोष्टीचा राग कुत्र्याच्या मालकाला आला. त्याने वाहन मालकालाच माझ्या कुत्र्याने तुझ्या गाडीवर लघुशंका केली. तुला काय करायचे ते करून घे, अशी धमकी दिली. त्यानंतर मॉन्टी कारभारी यांनी ४ ते ५ साथीदारांच्या मदतीने वाहन मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात वाहन मालक साईनाथ गाईकने हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, साईनाथ मनोज गाईकने यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. वगरे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- योग साधनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - International Yoga Day 2024
- सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
- चित्तथरारक! पोलीस कर्मचाऱ्याची दोन मिनिट तीस सेकंद पाण्याखाली योगसाधना! - International Yoga Day 2024