नागपूर Dog attack in Nagpur : नागपूर जिल्ह्यात अनेकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. अशातच मंगळवारी सायंकाळी एका भटक्या कुत्र्यानं लचके तोडल्यानं ३ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे.
शहरात श्वानांचा हैदोस : शहरात लहान मुलं खेळताना त्यांच्यावर श्वानांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेशनगर येथे घडली. शहरात भाड्यानं राहत असलेल्या शहाणे कुटुंबातील ३ वर्षाचा मुलगा वंश शहाणे याच्यावर मोकाट असलेल्या श्वानांनी हल्ला केला. श्वानानं चिमुकल्याच्या मानेचे आणि हाताचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना पाहताच वंशच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी त्याला लगेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. त्यामुळे मौदा शहरात भीतीचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं : घरकामामध्ये आई मग्न असताना नजर चुकवून वंश खेळण्यासाठी घराबाहेर पडाला. मात्र, त्याचवेळी भटक्या श्वानांनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना इतकी भयानक होती की यातील एका श्वानानं वंशची मान तोंडात घट्ट पकडली होती. तर दुसऱ्या भटक्या श्वानानं त्याच्या खांद्याला पकडलं होतं. श्वानांनी पकडल्यानं वंशनं जीवाच्या आकातानं मोठ्यानं रडण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकताच शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेत तेथील श्वानांना हुसकावून लावलं. वंशला गंभीर अवस्थेत पाहून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान तीन वर्षीय वंशचा मुत्यू झाला.
15 दिवसांत दुसरा घटना: मौदा शहरातील अनेक वस्त्यामंध्ये भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला. माणसांवर आणि लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना नियमीत होत असताना त्यावर ठोस उपाययोजना होत आहे. अगदी सकाळ-सायंकाळ कुत्रे वस्त्यामध्ये फिरताना दिसतात. १५ दिवसांमध्ये दोन चिमुकल्यांवर श्वानांनी हल्ला केल्यानं पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोकाट श्वानाला अन्न दिल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच मोकाट श्वानांवर नियंत्रण कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा