पुणे : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं गेल्या 36 वर्षापासून ना नफा ना तोटा या तत्त्वावर 'दि पूना मर्चंट्स चेंबर'कडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. यंदा या उपक्रमाचं 37 वे वर्ष आहे. सोमवारपासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा अडीच लाख किलो लाडू, चिवडा बनविण्यात येणार असल्याचा अंदाज यावेळी 'दी पूना मर्चंट्स चेंबर'चे सदस्य प्रवीण चोरबोले यांनी व्यक्त केला.
काय आहे भाव : 'दी पूना मर्चंट्स चेंबर'च्या वतीनं रास्त भावात लाडू, चिवडा विक्री केंद्राला सुरूवात झाली. यावर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव हा 180 रुपये आहे. तसेच विशेष म्हणजे, यंदा अर्धा किलोचं देखील पॅकेट्स देखील उपलब्ध झाले आहेत. या अर्धा किलोचा भाव 95 रुपये असणार आहे.
'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ची नोंद : 'दी पूना मर्चंट्स चेंबर'च्या वतीनं गेल्या 36 वर्षापासून रास्त भावात लाडू, चिवडा विक्री केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी आणि नागरिकांना चांगल्या दर्जाचं आणि कमी किंमतीमध्ये लाडू, चिवडा उपलब्ध व्हावं म्हणून 'चेबर'च्या वतीनं रास्त भावात लाडू, चिवडा विक्री केली जात आहे. या उपक्रमाची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये देखील नोंद झाली.
मोठ्या प्रमाणावर रोजगार : विशेष बाब म्हणजे, यंदाच्या या उपक्रमात तब्बल 700 हून अधिक कामगार हे काम करत आहेत. या सर्व कामगारांची मेडिकल तपासणी करण्यात आलीय. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून या महिला आणि पुरुष कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध होत आहे. राजस्थान येथील पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र लाडू, चिवडा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तसेच चेंबरच्या सदस्यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये तसेच स्वच्छ वातावरणात लाडू-चिवडा तयार केला जात आहे.
हेही वाचा -
- यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
- मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून दिवाळीचा फराळ निघाला परदेशात, यंदा फराळाच्या किंमतीत 25 टक्के वाढ
- मुंबईतून 176 देशांमध्ये निघाला दिवाळी फराळ; कोट्यवधींची होते उलाढाल, उद्योजकाने सांगितली 'ईटीव्ही न्यूज'ची खास आठवण