मुंबई : दिवाळी (Diwali 2024) आणि लज्जतदार फराळ हे पारंपरिक आणि सांस्कृतिक समीकरण आहे. महाराष्ट्रातल्या आणि परदेशातल्या नागरिकांना फराळाची लज्जत चाखता यावी यासाठी मुंबई, ठाण्यातून कोट्यवधी रुपयांचे फराळाचे जिन्नस दरवर्षी परदेशात पाठवले जातात. काय आहे फराळाची आर्थिक उलाढाल? जाणून घेऊयात.
परदेशात फराळ पाठवायला सुरुवात : दिवाळी म्हटलं की, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग फराळाची मेजवानी. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात हे चित्र दिसतं. मात्र, परदेशात राहणाऱ्या मराठी जणांना अथवा भारतीयांना फराळाची लज्जत चाखता यावी, यासाठी मुंबई, ठाण्यातून फराळ बनवून परदेशात मोठ्या प्रमाणात पाठवला जातो आहे. मुंबईतील दादर येथून फराळ बनवून तो परदेशात पाठवायला सुमारे वीस वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आज या उद्योगाला भरभराट आली असून दादर परिसरातून अनेक फराळ विक्रेते परदेशात फराळ पाठवत आहेत.
फराळाला परदेशातून मागणी : या संदर्भात बोलताना सचिन गोडबोले यांनी सांगितलं की, "गेल्या वीस वर्षापासून आम्ही फराळ परदेशात पाठवत आहोत. यामध्ये करंजी, चकल्या, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, रवा लाडू, चिरोटे शंकरपाळ्या, चॉकलेटच्या शंकरपाळ्या, डायट चिवडा अशा विविध प्रकारच्या फराळाला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. हा सर्व फराळ आम्ही सुबक आणि टिकाऊ पद्धतीनं पॅकेजिंग करून परदेशात पाठवतो. खरंतर आमचं वर्षभर फराळ पाठवायचं काम चालू असतं. मात्र दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आमच्याकडं ऑर्डर येतात".
दिवाळीसाठी तयार केले फॅमिली हॅम्पर : दिवाळीसाठी आम्ही वेगवेगळे हॅम्पर तयार केले आहेत. फॅमिली हॅम्पर आणि स्टुडंट हॅम्पर असे दोन प्रकार आहेत. फॅमिली हॅम्परमध्ये दोन कंदील, उटणे, पणत्या, रांगोळी याच्यासह सर्व फराळ असतो. तर विद्यार्थी हॅम्परमध्ये केवळ फराळ असतो. दरवर्षी आम्ही काही टन फराळ प्रदेशात पाठवत असतो. त्यामुळं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. नेमका आकडा सांगता येणार नाही. परंतु आमच्या पदार्थांना विशेष मागणी असते. वरील सर्व वस्तूंचे फॅमिली हॅम्पर 15000 रुपये कुरिअर चार्जेससह तर स्टुडन्ट हॅम्पर 14 हजारात कुरिअर चार्जेससह अमेरिका युके, दुबई, कॅनडा, हॉंगकॉंग, मलेशिया आणि युरोपियन देशांमध्ये पाठवले जाते. आम्ही आतापर्यंत 176 देशांमध्ये फराळ पाठवला असल्याचं सचिन गोडबोले यांनी सांगितलं. त्यांनी यावेळी २००५ सालची ईटीव्ही न्यूजची खास आठवणही आवर्जून सांगितली.
किलो नुसार फराळ हॅम्पर : दादरमधील अन्य विक्रेत्यांकडूनही परदेशात फराळ हॅम्पर पाठवले जातात. तीन किलो, चार किलो आणि सहा किलोचे हॅम्पर परदेशात पाठवले जातात. या हॅम्पर्सची किंमत वेगवेगळी असून अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, दुबई, हॉंगकॉंग, मलेशियासाठी साडेसात हजार ते बारा हजार रुपये कुरिअर चार्जेससह तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांमध्ये साडेनऊ हजार ते साडे चौदा हजार रुपयांपर्यंत तीन ते सहा किलोचे हॅम्पर जातात असं पणशीकरांनी सांगितलं. साधारण ऑर्डर नोंदवल्यानंतर परदेशात दहा ते पंधरा दिवसात ही ऑर्डर पोहोचते. त्यामुळं फराळाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. अतिशय टिकाऊ आणि सुबक पॅकेजिंगमध्ये हे पदार्थ पाठवले जातात. त्यामुळं परदेशातही भारतीय किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदानं आपल्या चवीच्या आवडत्या फराळासोबत दिवाळी साजरी करता येते, असं पणशीकरांनी सांगितलं.
हेही वाचा -