मुंबई : दरवर्षी पावसाळ्यानंतर आणि दिवाळीत मुंबईमधील प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात होते. दिवाळीनंतर तर हवेची गुणवत्ता अधिकच खालावते. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आता दिवाळी आधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन बृहन्मुंबई मुंबईकरांना केलंय. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. विशेष करून लहान मुलांची जास्त काळजी घेण्याचं आवाहनदेखील बृहन्मुंबई पालिकेकडून करण्यात आलंय.
'या' वेळेत फोडा फटाके : बृहन्मुंबई पालिकेनं जारी केलेल्या सूचनांमध्ये फटाके कोणत्या प्रकारातील असावेत आणि फटाके रात्री किती वाजेपर्यंत फोडावेत, याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. जास्त आवाज न करणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य देवून कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. सोबतच फटाके फोडण्याची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी, असं आवाहन महानगरपालिका प्रशासानानं केलंय. तसंच फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळं लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचं देखील नुकसान होतं, ही बाब देखील सर्वांनी लक्षात घ्यावी, असंही पालिका प्रशासनानं म्हटलंय.
'या' आहेत पालिकेच्या सूचना :
- दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. तो प्रकाशासोबत साजरा करण्यास प्राधान्य देऊन ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळावं.
- ध्वनी विरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावं.
- कमीत कमी वायू प्रदूषण करणारे फटाके फोडावेत.
- फटाके फोडण्याची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी.
- ज्येष्ठ नागरिक आणि हृदयरुग्णांप्रती जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणं टाळावं.
- सुरक्षिततेस सर्वोच्च महत्व द्यावं.
- फटाके फोडताना शक्यतो सूती कपडे परिधान करावेत. सैलसर (Oversized) कपडे वापरू नयेत.
- फटाके फोडताना ते मोकळ्या जागी फोडावेत.
- गर्दीची ठिकाणे, अरूंद गल्ली यांसारख्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
- फटाके फोडताना मोठ्या व्यक्तींनी मुलांसोबत रहावं.
- फटाके फोडताना सुरक्षिततेचा भाग म्हणून पाण्यानं भरलेली बादली, वाळू इत्यादी बाबी जवळ बाळगाव्यात.
- फटाके फोडताना कोरडी पाने, कागद किंवा कोणतीही इतर सामग्री जाळू नये, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय.
- फटाक्यामुळं चेंबरमधील गॅसचा स्फोट : पुणे शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नऱ्हे येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ड्रेनेज लाईनच्या चेंबरवर फटाके फोडल्यामुळं चेंबरमधील गॅसचा स्फोट झाला. या घटनेत दोन ते तीन लहान मुलं जखमी झाली आहेत. त्यामुळं फटाके फोडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
हेही वाचा -