छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता आम्ही जबाबदारी घेतो आणि पुतळा उभारतो, अशी भूमिका धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठानतर्फे महाराजांचा पुतळा घेऊन काही सदस्य सिंधुदुर्ग येथे पोहचले असता पोलिसांनी त्यांना अडवलं. मात्र, अजूनही पुतळा सिंधुदुर्ग येथे असून सरकार नवीन पुतळा कधी बसवणार हे त्यांनी सांगावं. उशीर होणार असेल तर आम्ही आणलेला पुतळा बसवावा. महाराजांचा पुतळा बसेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुतळा घेऊन संघटनेचे पदाधिकारी सिंधुदुर्गात : सिंधुदुर्ग येथे बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वच पक्ष, संघटना आक्रमक झाल्या असून सरकारविरोधी रोष व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यावर मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आंदोलन केले जात आहेत. राजकीय वातावरण तापलं असताना मराठवाड्यातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे सरकारविरोधात आग्रही भूमिका घेण्यात आली.
शिवप्रेमी संघटना आक्रमक : संघटनेतर्फे फायबर आणि केमिकलनं तयार केलेला महाराजांचा 16 फुटी पुतळा मालवण येथे नेला. महाराजांच्या पुतळ्याची जागा रिकामी नको, त्यामुळं तातडीनं हा पुतळा बसवावा. फायबरच्या माध्यमातून पुतळा तयार करण्यात आला असल्याने पुढील पन्नास वर्ष त्याला काहीही होणार नाही, असा दावा संघटनेनं केलाय. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवलं, पुतळा कधी बसवणार हे सरकारनं सांगावं, अशी भूमिका यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननं मांडली.
दहा दिवसात निर्णय घ्या अन्यथा....: गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा 16 फुटी पुतळा घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजकोट येथे पोहचले. त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं असलं तरी अद्याप संघटनेचे पदाधिकारी पुतळा घेऊन तिथेच थांबले आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये त्याठिकाणी पुतळा कधीपर्यंत बसवणार हे सरकारनं स्पष्ट केलं नाही तर नेलेला फायाबरचा पुतळा आम्ही बसवणार. त्याठिकाणी प्रशासन, पोलीस यांच्यासोबत संघर्ष झाला तरी चालले, मात्र आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी दिलाय.
हेही वाचा
- मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यासाठी मनिषा म्हैसकर यांच्या नेतृत्वाखाली समिती - Statue of Shivaji Maharaj
- शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर माफी; म्हणाले... - PM Narendra Modi Apology
- दोषींवर कारवाई होणारच, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही- अजित पवार - Ajit Pawar Malvan Visit
- "शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी"; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue