शिर्डी Sai Baba Temple Shirdi : लाखो भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईचरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा व्यक्त केली. यावेळी भाविकांनी आपली गुरुभक्ती व्यक्त करताना साईचरणी भरभरुन गुरुदक्षिणा दिली. शिर्डीतील तीन दिवसाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात तब्बल 6 कोटी 25 लाख रुपयांची देणगी भाविकांनी साईचरणी अर्पण केली.
भाविकांनी अशी दिली साईचरणी गुरुदक्षिणा : साई मंदिर परिसरातील देणगी काऊंटरवर 1 कोटी 20 लाख देणगी प्राप्त झाली. तर हुंडीत ( देणगी पेट्यात ) 2 कोटी 53 लाख प्राप्त झाले आहेत. शिर्डीत येऊ न शकलेल्या भाविकांनी ऑनलाइनच्या तसेच चेक, डीडीच्या माध्यमातून 1 कोटी 95 रुपयांची देणगी दिली आहे. याच बरोरबर 8 लाख रुपयांचं सोनं आणि 2 लाख 70 हजार रुपयांची पाच किलो चांदीही साईबाबा चरणी अर्पण करण्यात आली आहे.
साईचरणी दान करण्याचं प्रमाण वाढलं : शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी दान करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच बरोबरीनं गेल्या काही वर्षापासून साईदरबारी येत मोठ्या प्रमाणात भाविक रक्तदानही करत आहेत. या गुरुपोर्णिमा उत्सवातील तीन दिवसात 205 भाविकांनी साईचरणी रक्तदान अर्पण केलं आहे. साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात सुमारे 1 लाख 91 हजार 349 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर दर्शन रांगेत 1 लाख 96 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचं वाटप करण्यात आलं. या कालावधित 62 लाख 31 हजार 125 रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून साई संस्थानला प्राप्त झाले.
प्रथमोपचार केंद्रात तब्बल इतक्या साईभक्तांनी घेतला उपचार : उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणात निवास केला. याशिवाय अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. साई धर्मशाळा इथं विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारण 5810 साईभक्तांनी उपचार घेतला आहे. या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवात तब्बल 4 लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
हेही वाचा :